सिडकोच्या पुनर्वसन पॅकेजपासून वंचित; कुटुंबाचा आत्महत्येचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:48 IST2018-10-30T00:48:36+5:302018-10-30T00:48:53+5:30
विमानतळबाधित वरचे ओवळे गावात मागील पंचवीस वर्षांपासून राहणाऱ्या एका बांधकामधारकाला पुनर्वसन पॅकेजपासून वंचित ठेवले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सिडकोच्या पुनर्वसन पॅकेजपासून वंचित; कुटुंबाचा आत्महत्येचा इशारा
नवी मुंबई : विमानतळबाधित वरचे ओवळे गावात मागील पंचवीस वर्षांपासून राहणाऱ्या एका बांधकामधारकाला पुनर्वसन पॅकेजपासून वंचित ठेवले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याविरोधात संबंधित कुटुंबाने आक्रमक पवित्रा घेतला असून न्याय न मिळाल्यास कुटुंबीयांसह आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
वरचे ओवळे गावात आरेनकेरी कुटुंबीय १९८५ पासून झोपडीवजा घरात राहत आहेत. वरचे ओवळे गाव विमानतळ बाधित क्षेत्रात आल्यानंतर सिडकोने सर्व्हे करून आरेनकेरी कुटुंब रहात असलेल्या झोपडीला ओव्ही-३९८ असा क्र मांक देखील दिला. त्यामुळे आरेनकेरी कुटुंबाला सिडकोकडून नुकसानभरपाई म्हणून पर्यायी घर मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु मूळ जमीन मालकाने संगनमत करून सिडकोकडून मिळणारे पुनर्वसन पॅकेज लाटल्याचा आरोप आरेनकेरी कुटुंबीयांनी केला आहे.
पुनर्वसन योजनेचा लाभ घेणाºया प्रकल्पग्रस्तांना विमानतळबाधित गावे रिकामी करावी लागणार आहेत. त्यामुळे आम्ही रहात असलेल्या घरातून जबरदस्तीने हुसकावून लावण्याचे प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी धमकावले जात आहे. आम्ही पंचवीस वर्षांपासून येते राहत आहोत. त्यामुळे सिडकोने आम्हालाही नियमानुसार पुनर्वसन पॅकेज द्यावे, अन्यथा सामूहिक आत्महत्या करू, असा इशारा या कुटुंबीयांनी पोलीस व सिडको प्रशासनाला दिलेल्या पत्राद्वारे दिला आहे.