नवी मुंबई - विविध कारणांमुळे सिडकोची जवळपास १२ हजार घरे विक्रीविना पडून आहेत. ती विकण्यासाठी गृहविक्री धोरणात बदल करण्याची चाचपणी सिडकोकडून केली जात आहे. नियमानुसार सध्या पती किंवा पत्नीच्या नावे नवी मुंबईत एक घर असेल तर दुसरे घर घेता येत नाही. मात्र, या नियमात बदल करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सिडकोने २०१७-२२ या कालावधीत जवळपास २५ हजार घरे बांधली आहेत. त्यातील ६ हजार घरे विक्रीविना पडून आहेत. तर अलीकडेच काढलेल्या २६ हजार घरांच्या योजनेतील तब्बल ७ हजार घरे शिल्लक आहेत. या शिल्लक घरांची विक्री कशी करायची, असा प्रश्न सिडकोला सतावत आहे. सिडकोचे घर घेण्यासाठी अनेक अटी व शर्तींचे पालन करावे लागते. विशेषत: पती किंवा पत्नीच्या नावे नवी मुंबई शहरात घर असेल तर सिडकोचे घर घेता येत नाही, ही प्रमुख अट सर्वसामान्यांना जाचक ठरत आहे.
कुटुंब वाढल्यानंतर दुसऱ्या घराची गरज भासते, परंतु खासगी प्रकल्पांत घर घेणे परवडत नाही. अशावेळी सिडकोचे घर आर्थिकदृष्ट्या सोयीचे ठरते. सिडकोच्या नियमानुसार दुसरे घर घेता येत नसल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. ही अट शिथिल करता येईल का, यादृष्टीने सिडकोचा संबंधित विभाग अभ्यास करीत असल्याचे समजते. ही प्रमुख अट शिथिल झाल्यास हजारो कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे. सिडकोची घरेही विकली जातील, असे कयास बांधले जात आहेत.