वाशी गावातील जेट्टी, जोड रस्त्याचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 05:43 IST2018-08-28T05:42:59+5:302018-08-28T05:43:23+5:30
मच्छीमारांना दिलासा : एक कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प

वाशी गावातील जेट्टी, जोड रस्त्याचे उद्घाटन
नवी मुंबई : वाशी गावात एक कोटी रुपये खर्च करून मच्छीमारांसाठी उभारण्यात आलेली जेट्टी, जोड रस्ता, सभा मंडप आणि काँक्रीट रॅम्पचे बेलापूरच्या आमदारमंदा म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर स्थानिक मच्छीमारांना या सुविधा उपलब्ध झाल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक मच्छीमारांना विविध समस्या भेडसावत होत्या. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मंदा म्हात्रे यांनी सर्वप्रथम स्थानिक मच्छीमारांच्या प्रश्नांची दखल घेतली. त्यांनी विविध गावांना भेटी देऊन तेथील मच्छीमारांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानुसार अनेक ठिकाणी उपाययोजनाही केल्या आहेत. वाशी गावातील मच्छीमारांचे प्रश्नसुद्धा सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. त्यानुसार मत्स्य उद्योग विभागाकडे पाठपुरावा करून वाशी गावात मासळीची चढ-उतार करणे सुलभ व्हावे, यासाठी सुसज्ज जेट्टी उभारली आहे. तसेच जोड रस्ता, काँक्रीटचे रॅम्प, जाळी विणण्यासाठी शेड, विविध धार्मिक विधीसाठी सभामंडप, मासळी सुकविण्यासाठी चौथरा आदीची पूर्तता केली आहे. त्यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या सर्व सुविधांचे आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कोळी बांधवांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात यश आले, ही मोठी समाधानाची बाब असल्याची प्रतिक्रिया मंदा म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केली. तर नवी मुंबईतील कोणत्याही नेत्यांनी मच्छीमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. मंदा म्हात्रे यांनी मात्र हा प्रश्न धसास लावल्याने प्रतिकूल परिस्थितीत मासेमारी करणाºया मच्छीमारांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया मरीआई मच्छीमार संस्थेचे चेअरमन हरिश्चंद्र सुतार यांनी व्यक्त केली आहे. या वेळी चेरेदेव मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष दिलीप पाटील, श्यामकांत सुतार आदींसह गावातील कोळी बांधव उपस्थित होते.