प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या; पत्नीसह तिघांना अटक, मृतदेह खाडीत दिला फेकून
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 08:04 IST2025-05-26T08:04:15+5:302025-05-26T08:04:15+5:30
पती हरवल्याचा केला होता बनाव

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या; पत्नीसह तिघांना अटक, मृतदेह खाडीत दिला फेकून
नवी मुंबई : प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून हरवल्याचा बनाव केल्याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली रिक्षासुद्धा पोलिसांनी जप्त केली असून, त्यात रक्ताचे डाग आढळले आहेत. मात्र, बाळकूम खाडीत शोधमोहीम करूनही मृतदेह मिळाला नाही.
पती-पत्नीत सतत होणारे भांडण व प्रियकराची ओढ यातून महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पत्नीने पती हरवल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत संशयाची पाल
चुकचुकल्याने गुन्हा उघडकीस आला होता. त्यांनी पतीला गंभीर जखमी करून बाळकूम खाडीत फेकलेल्या ठिकाणी पोलिसांनी शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही. दरम्यान, हत्येच्या रचलेल्या कटाप्रमाणे आवश्यक सबळ पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. त्यावरून पूनम वाघमारे (२८), सुरेश यादव (२४) व त्यांना मदत करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक केली आहे. १६ तारखेला पोलिसांकडे कालिदास वाघमारे (३०) बेपत्ता झाल्याच्या तक्रारीवरून पत्नी पूनम हिचा कट पोलिसांनी शिताफीने उघड केला आहे.
रिक्षात रक्ताचे डाग, घटनाक्रम उघड
गुन्ह्यासाठी वापरलेल्या रिक्षाचा पोलिसांनी शोध घेतला असता फॉरेन्सिक पथकाला त्यात रक्ताचे डाग मिळाले. गुन्ह्यानंतर त्याने रिक्षा धुवून घेतली असतानाही अडचणीच्या ठिकाणी रक्ताचे नमुने पोलिसांना मिळाले. त्यावरून कालिदास यांना मारहाण करून बाळकूम खाडीत फेकल्याचा घटनाक्रम पोलिसांसमोर स्पष्ट झाला आहे.