काळ्या यादीत टाकले म्हणून एचपीसीएलच्या व्यवस्थापकास मारहाण
By नारायण जाधव | Updated: November 4, 2023 17:22 IST2023-11-04T17:22:24+5:302023-11-04T17:22:51+5:30
रॉडने व्यवस्थापक उदयराज सिंग यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी तुर्भे पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

काळ्या यादीत टाकले म्हणून एचपीसीएलच्या व्यवस्थापकास मारहाण
नवी मुंबई : लॉजिस्टिक कंपनीची सेवा चांगली नाही म्हणून तुर्भे येथील भारत सरकारच्या एचपीसीएल कंपनीच्या व्यवस्थापकांनी तिला काळ्या यादीत टाकले होते. याचा राग येऊन स्वस्तिक लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट कंपनीतील टँकरचालकाने मित्रांच्या मदतीने रॉडने व्यवस्थापक उदयराज सिंग यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी तुर्भे पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
या मुख्य आरोपी टँकरचालक सागर यादवसह त्याचे मित्र प्रदीप यादव, रोहित यादव, भोलू यादव (सर्व रा. ठि. विशाल हॉटेलच्या समोर, गांधीनगर, तुर्भे, नवी मुंबई) यांचा समावेश आहे.
गुरुवारी दुपारी साडेचार-पाच वाजेच्या सुमारास आरोपींनी एचपीसीएल कंपनी, तुर्भे, नवी मुंबई येथे व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या उदयराज सिंग यांना मारहाण केली. हे कळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौघा आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी केलेल्या मारहाणीत उदयराज सिंग यांच्या डोक्यात, पाठीवर व पायास गंभीर दुखापत झाली आहे. तसेच, त्यांच्या डाव्या हाताच्या दंडाला चाकूने मारून त्यांना जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.