उच्चशिक्षित युवकांनी जपली लोककला
By Admin | Updated: July 6, 2017 06:37 IST2017-07-06T06:37:21+5:302017-07-06T06:37:21+5:30
भारतीय लोककला हा आपल्या संस्कृतीमधील एक महत्त्वाचा घटक आहे. या लोककलांमध्ये अनेक लोककला या पारंपरिक

उच्चशिक्षित युवकांनी जपली लोककला
- दाजी कोळेकर
भारतीय लोककला हा आपल्या संस्कृतीमधील एक महत्त्वाचा घटक आहे. या लोककलांमध्ये अनेक लोककला या पारंपरिक पद्धतीने जपल्या जात असून त्या एका पिढीकडून दुसऱ्या पुढच्या पिढीकडे संक्रमित होत असल्याचे दिसून येते. अशा काही लोककलांमध्ये गजनृत्य म्हणजेच कैपत नृत्य ही कला आहे. ही लोककला मुंबईसारख्या महाकाय नगरीमध्ये आजही जतन केली जात असल्याचे दिसून येते आणि तीही उच्चशिक्षित तरुण पिढीकडून शिक्षण घेत व रोजगार करत.
बिरोबा देवस्थान असणारे सांगली जिल्ह्यातील आरेवाडी हे गाव या लोककलेमुळे नावारूपास येत आहे. आरेवाडीमध्ये मागील शेकडो वर्षांपासून ही लोककला जपली जात असून या गावातील रोजगारासाठी मुंबईत आलेल्या काही युवकांनी गेल्या ५० वर्षांपासून ही कला जपण्यासाठी धडपड सुरू केली. मुंबईमध्ये या लोककलेला व्यासपीठ आणि वैभव मिळवून देण्यासाठी माजी मंत्री शिवाजीराव (बापू) शेंडगे आणि मेंढपाळ कामगार नेते पांडुरंग कोळेकर यांनी मोलाचे योगदान दिले आणि त्याचाच लाभ उठवत सर्वांच्या सहकार्याने आकाराम कोळेकर यांनी ही लोककला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविली. १९८९ साली मुंबईमध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ‘अपना उत्सव’ मध्ये सहभाग घेवून वाहवा मिळविल्यानंतर ही लोककला चांगलीच चर्चेत आली आणि मुंबईच्या सांस्कृतिक वैभवातील एक महत्त्वाचा घटक बनली.
अशी ही पारंपरिक लोककला घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या आणि धावपळीचे जीवन जगणाऱ्या महाकाय नगरीमध्ये आजही जपली जात आहे आणि तीही उच्चशिक्षित तरुणांकडून. मुंबईतील ५० वर्षांची परंपरा असणाऱ्या या लोककलेचा आता दुसरी पिढी वारसा चालवत आहे. या लोककलेमधील अनेक युवक अभियांत्रिकी, व्यवस्थापनातील पदवीचे शिक्षण घेत आहेत, तर काही शिक्षण पूर्ण करून विविध क्षेत्रात नोकरीही करीत आहेत. पण हे करत असताना आपल्या लोककला जतनामध्ये ते कुठेही कमी पडत नाहीत.
आपल्या पूर्वजांसारखे तितकेच जोमाने ही लोककला जतन करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे ही लोककला मुंबईच्या सांस्कृतिक वैभवात आणखी भर घालत नावारूपास येईल असेच या पिढीजात परंपरेवरून दिसून येत आहे.
अनेक दिग्गजांकडून गजनृत्य कलेचे कौतुक : शेकडो वर्षांची मूळ परंपरा असलेल्या या लोकक लेने मागील ३०-४० वर्षांमध्ये मुंबईसह राज्याचे अनेक ठिकाणी प्रतिनिधित्व करत आपली लोकप्रियता वाढवली आहे. देशातील अहमदाबाद ते आसाम आणि हरियाणा ते कन्याकुमारी अशा विविध ठिकाणी पार पडलेल्या सांस्कृतिक महोत्सवांमध्ये आपली ढंगदार लोककला सादर करून वाहवा मिळविली आहे. ही लोककला देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंपासून ते आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक पंतप्रधानांनी व राष्ट्रपतींनी या लोककलेचा आस्वाद घेत कौतुक केले आहे. देशातील प्रत्येक राज्याच्या राजधानीमध्ये आणि मोठ्या शहरवासीयांनी ही लोककला पाहिली आहे. या लोककलेच्या इतिहासामध्ये १९५८ दिल्ली दौरा, २००१ चा पहिला आंतरराष्ट्रीय इंग्लंड दौरा आणि २००९ मधील रशियाचा दौरा, हे ऐतिहासिक आणि पे्ररणादायी दौरे असल्याचे दिसून येते.
१५० वर्षे राज्य केलेल्या ब्रिटिशांकडून मानाचा मुजरा : आॅगस्ट २००१ मध्ये या लोककलाकारांनी इंग्लंडमधील एडिंबर्ग आणि स्कॉटलंडमध्ये आपली कला सादर करून पहिला आंतरराष्ट्रीय दौरा केला. त्या वेळी भारतावर १५० वर्षे राज्य करणाऱ्या गोऱ्या साहेबांनी या कलावंतांना सलाम केला. या आंतरराष्ट्रीय दौऱ्यामध्ये मुंबईकरांना भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रात मुंबईसह महाराष्ट्राचा दबदबा वाढत गेला.