गुजरातमधून आणलेला २.७२ कोटींचा गुटखा जप्त; चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 11:20 IST2025-07-25T11:19:44+5:302025-07-25T11:20:01+5:30
मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात विक्रीसाठी आणलेला २ कोटी ७२ लाखांचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी भिवंडीत जप्त करण्यात आला.

गुजरातमधून आणलेला २.७२ कोटींचा गुटखा जप्त; चौघांना अटक
नवी मुंबई : मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात विक्रीसाठी आणलेला २ कोटी ७२ लाखांचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी भिवंडीत जप्त करण्यात आला. या प्रकरणी फरहान शेख, जितेंद्र वसुनिया, भूपेंद्र सिंह, भवर सिंह यांना अटक करण्यात आली आहे.
२१ जुलै रोजी नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने कामोठे येथे छापा टाकून १७ लाखांचा गुटखा जप्त केला होता. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने भिवंडीतून हा गुटखा आणल्याचे सांगितले. त्यानुसार कारवाईसाठी सहायक आयुक्त अशोक राजपूत यांनी वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी यांच्यासह तीन अधिकारी, २० कर्मचाऱ्यांचे पथक नेमले हाेते.
अनेक वर्षांपासून पुरवठा, विक्रीचे सुरू आहे चक्र
भिवंडी परिसरातून छोट्या वाहनांत भरून हा गुटखा मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पुरवला जात आहे. मागील अनेक वर्षांपासून गुटखा पुरवठा विक्रीच्या रॅकेटकडून हे चक्र चालत आले आहे. त्यात गुटखा बनविणाऱ्यांसह ट्रान्सपोर्टर व सर्व शहरांतील विक्रेत्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात गुटखा बंदी असतानाही गुजरातमधून आणून त्याचा पुरवठा करणारे सूत्रधार मात्र पोलिसांच्या हाती लागू शकलेले नाहीत. राज्य शासनाकडून हे प्रकरण गांभीर्याने घेतले जात नसल्याने बेकायदा गुटखा विक्रीच्या मुळावर घाव घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे हात तोकडे पडत आहेत. यातूनच गुजराती पुरवठादारांना पाठबळ कोणाचे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून यात सहभागी असलेल्यांचा शाेध पाेलिस घेत आहेत.