नागरिकांसाठी आनंदाची बातमी; स्वप्नपूर्तीसाठी मिळाली आणखी एक संधी, सिडकोचा महत्त्वपूर्ण निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 06:15 IST2024-11-11T06:14:38+5:302024-11-11T06:15:00+5:30

अधिकाधिक ग्राहकांनी अर्ज नोंदणी करून हक्काच्या घराची स्वप्नपूर्तता करावी, असे आवाहन सिडकोच्या संबंधित विभागाने केले आहे. 

Good news for citizens Extension of registration for CIDCO houses | नागरिकांसाठी आनंदाची बातमी; स्वप्नपूर्तीसाठी मिळाली आणखी एक संधी, सिडकोचा महत्त्वपूर्ण निर्णय!

नागरिकांसाठी आनंदाची बातमी; स्वप्नपूर्तीसाठी मिळाली आणखी एक संधी, सिडकोचा महत्त्वपूर्ण निर्णय!

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतील घरांची नोंदणी करण्यासाठी सिडकोने एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे.   त्यामुळे विविध कारणांमुळे ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचे राहून गेलेल्या ग्राहकांना आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे. या कालावधीत अधिकाधिक ग्राहकांनी अर्ज नोंदणी करून हक्काच्या घराची स्वप्नपूर्तता करावी, असे आवाहन सिडकोच्या संबंधित विभागाने केले आहे. 

सिडकोच्या माध्यमातून शहराच्या विविध नोडमधील २७ ठिकाणी ६७ हजार घरे बांधली जात आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ४३ हजार घरांना ‘महारेरा’ची परवानगी प्राप्त झाली असून, त्यांचे बांधकामही प्रगतिपथावर आहे. त्यातील २६ हजार घरांची योजना ११ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची अखेरची मुदत ११ नोव्हेंबरपर्यंत होती. सोमवारी अर्ज नोंदणीचा अखेरचा दिवस आहे. 

दिवाळी, आता निवडणुका त्यामुळे अनेकांना ऑनलाईन अर्ज नोंदणी करता आलेली नाही. ही बाब लक्षात घेऊन सिडकोने अर्ज नोंदणीसाठी ११ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

आतापर्यंत ८१ हजार ग्राहकांची नोंद
रविवार संध्याकाळपर्यंत तब्बल ८१ हजार ९०० ग्राहकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी २२ हजार २१ ग्राहकांनी अर्ज नोंदणी शुल्काचा भरणा केला आहे. हा आकडा उपलब्ध घरांच्या संख्येपेक्षा कमी असल्याने संगणकीय सोडत काढताना तांत्रिक अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्ज नोंदणीसाठी एक महिन्याची मुदतवाढ दिल्याचे समजते.

Web Title: Good news for citizens Extension of registration for CIDCO houses