पावसामुळे फळांचे दर घसरले; भाजीपालाही राहिला शिल्लक, एपीएमसीत ग्राहकांनी फिरविली पाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 06:06 IST2025-05-27T05:55:10+5:302025-05-27T06:06:53+5:30
बाजार समितीमध्ये सोमवारी फक्त ९०७ टन फळांची आवक झाली.

पावसामुळे फळांचे दर घसरले; भाजीपालाही राहिला शिल्लक, एपीएमसीत ग्राहकांनी फिरविली पाठ
नवी मुंबई : मुंबईसह नवी मुंबईमध्येही सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारावरही झाला आहे. ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे फळांच्या दरामध्ये घसरण झाली आहे आणि मागणीअभावी भाजीपालाही मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिला.
बाजार समितीमध्ये सोमवारी फक्त ९०७ टन फळांची आवक झाली. ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्यामुळे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरण्यास सुरुवात झाली आहे. हापूस आंब्याचे दर ५०० ते ६०० रुपये डझनवरून ३०० रुपयांवर आले. कर्नाटक हापूस व इतर आंब्याचे दरही प्रतिकिलो ९० ते २०० रुपयांवरून ८० ते १८० रुपयांवर आले आहेत. जांभळाचे प्रतिकिलो दर देखील ३५० ते ४५० रुपयांवरून २५० ते ३५० रुपये किलो झाले आहेत. गत आठवड्यात २०० ते ३०० रुपये किलो दराने विकली जाणारी लिची १५० ते २०० रुपये किलोपर्यंत घसरली आहे.
सर्व मार्केट जलमय
बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये नालेसफाई पूर्णपणे झालेली नाही. सोमवारी फळ मार्केटच्या प्रवेशद्वारावर २ फूट पाणी साचले होते. कांदा, बटाटा, मसाला व धान्य मार्केटमध्येही काही ठिकाणी पाणी साचले होते.
कोथिंबीरसह, टोमॅटोचे नुकसान
भाजीपाला मार्केटमध्ये २ हजार टन आवक झाली आहे; परंतु ग्राहक नसल्यामुळे जवळपास ५०० टन माल शिल्लक राहिला आहे. कोथिंबिरीसह टोमॅटोचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजीपाल्याच्या दरामध्ये फारसा फरक पडला नसून, गत आठवड्यात दर स्थिर आहेत.