वेळेत कर भरल्यास मोफत रवा, साखर, मैदा, गूळ, चणाडाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 00:12 IST2021-03-13T00:12:00+5:302021-03-13T00:12:20+5:30
शिवकर ग्रामपंचायतीकडून होळीनिमित्त अनोखी भेट

वेळेत कर भरल्यास मोफत रवा, साखर, मैदा, गूळ, चणाडाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : घरपट्टी व पाणीपट्टीचा कर १५ मार्चपर्यंत भरणा केल्यास शिवकर ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना मोफत रवा, साखर, मैदा, गूळ, चणाडाळ भेट दिली जाणार आहे. शिवकर ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायत असून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारी ग्रामपंचायत म्हणून शिवकर ग्रामपंचायतीची ओळख आहे.
सरपंच अनिल ढवळे यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम राबविले जातात. त्यापैकीच हा एक उपक्रम आहे. थकबाकीसहित वेळेत कर भरणाऱ्या ग्रामस्थांना ग्रामपंचायतीकडून होळीनिमित्त विशेष भेट देण्याची योजना तालुक्यातील आदर्श शिवकर ग्रामपंचायतीकडून राबवली जात आहे.
सरपंच अनिल ढवळे यांनी घोषणा केली असून कर भरणाऱ्या नागरिकांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून २ किलो रवा, २ किलो साखर, २ किलो मैदा, २ किलो गूळ तसेच २ किलो चणाडाळीचे पॅकेज ग्रामपंचायत उपलब्ध करून देणार आहे. तालुक्यातील शिवकर या ग्रामपंचायतीची लोकसंख्या साडेतीन हजार आहे. रायगड जिल्ह्यातून प्रथम पुरस्कार मिळवणाऱ्या या ग्रामपंचायतीमार्फत गावाच्या विकासाकरिता विविध उपक्रम राबवले जातात. गावाच्या विकासाकरिता महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या घरपट्टी तसेच पाणीपट्टी स्वरूपात जमा होणाऱ्या रकमेची वेळेत वसुली करून गावाच्या विकासात भर पडावी, यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल ढवळे प्रयत्न करत आहेत.
ग्रामपंचायतीतर्फे ६० हजारांची पाणीपट्टी
शिवकर ग्रामपंचायत हद्दीत ४२१ नळजोडण्या असून या ठिकाणी नवी मुंबई पालिकेच्या जलवाहिनीमार्फत पाणीपुरवठा केला जातो. नवी मुंबई पालिकेला ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठ्यापोटी दरमहिना ६० हजार इतकी पाणीपट्टी भरावी लागते.