गणेशोत्सवात ७२ मंडळांकडून रस्ता मोकळा
By Admin | Updated: September 14, 2015 23:48 IST2015-09-14T23:48:02+5:302015-09-14T23:48:02+5:30
पोलिसांनी साधलेल्या समन्वयानुसार यंदाच्या गणेशोत्सवात ७२ मंडळांनी रस्त्याऐवजी मैदानावर उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रस्ता अडून होणाऱ्या

गणेशोत्सवात ७२ मंडळांकडून रस्ता मोकळा
- सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
पोलिसांनी साधलेल्या समन्वयानुसार यंदाच्या गणेशोत्सवात ७२ मंडळांनी रस्त्याऐवजी मैदानावर उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रस्ता अडून होणाऱ्या वाहतूक कोंडीचे विघ्न दूर झालेले आहे. तर ३८ मंडळे रस्त्याच्या अवघा २५ टक्के भागातच मंडप रचून नियमांचे पालन करणार आहेत.
सार्वजनिक मंडळांकडून रस्त्यावर गणेशोत्सव साजरा केल्याने त्याठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असे. दहा दिवस साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीपासून ते विसर्जनानंतरचे तीन ते चार दिवस रस्त्यावरच मंडप असायचे. यामुळे त्या १५ ते २० दिवसात नागरिकांना विविध त्रासाला सामोरे जावे लागते. यामुळे रस्त्यावर उत्सव साजरे न करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई पोलिसांनी शहरातील गणेशोत्सव मंडळांना रस्त्यावर गणेशोत्सव साजरा न करण्याचे आवाहन केले होते. पोलिसांनी हीच भूमिका दहीहंडी उत्सवात देखील घेतल्याने बहुतांश मंडळांनी नेहमीच्या ठिकाणालगतचे मैदान गाठले होते. यामुळे यंदा प्रथमच दहीहंडीत कुठेही वाहतूक कोंडी होवून सर्वसामान्यांना त्रासाचा सामना करावा लागला नाही. त्यानुसार यंदाचा गणेशोत्सव देखील निर्विघ्न साजरा व्हावा याकरिता गणेशमूर्तीची स्थापना रस्त्याऐवजी मैदानात करण्याचे आवाहन पोलिसांनी सार्वजनिक मंडळांना केले होते. सालाबादप्रमाणे यंदाही ११० सार्वजनिक मंडळे गणेशोत्सव साजरा करणार आहेत. त्यापैकी ७२ सार्वजनिक मंडळांनी रस्ता मोकळा करत मैदानाची वाट धरली आहे. तर ३८ मंडळांनी जरी रस्त्यावरच मंडप थाटले असले तरी, पोलीस व महापालिकेने सुचवल्याप्रमाणे रस्त्याचा अवघा २५ टक्के भाग ते मंडपासाठी वापरणार आहेत.
गणेशोत्सव मंडळांना पोलीस व पालिकेची परवानगी प्रक्रिया सोपी करत एक खिडकी योजना राबवण्यात आलेली आहे. त्याद्वारे अद्यापपर्यंत छोट्या - मोठ्या ४०८ मंडळांनी परवानगी मिळवलेली आहे. (प्रतिनिधी)
मंडपासाठी रस्ता न खोदण्याच्या सूचना पालिकेने केल्या आहेत. त्यानंतरही वाशी व इतर काही ठिकाणी मंडळांनी रस्त्यावरच खड्डे पाडून स्वागत कमानी उभारलेल्या आहेत. या कमानींमुळे वाहनांच्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
रस्त्यावरील मंडपांना मैदानात स्थलांतरित करण्यात कोपरखैरणे पोलिसांना पूर्णपणे यश आले आहे. गतवर्षी संपूर्ण परिसरात १२ मंडळांनी रस्त्यावर मंडप रचले होते. मात्र पोलिसांच्या विनंतीनुसार यंदा त्या बाराही मंडळांनी लगतच्या मैदानात गणेशोत्सव साजरा करण्याचा लोकहिताचा निर्णय घेतला आहे.
ऐरोली, रबाळे परिसरात मैदानाअभावी यंदाही १६ मंडळांनी नियमांचे पालन करत रस्त्यावरच मंडप उभारले आहेत. मात्र तिथल्या ३५ पैकी १९ मंडळांनी यंदा मैदानाचा पर्याय निवडला आहे.
वाशीत गतवर्षी १०२ मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला. त्यापैकी ३२ मंडळांनीच यंदा गणेशोत्सवाची तयारी चालवली आहे. विभागातील मंडळांची संख्या घटण्यामागे तिथला मैदानांचा तुटवडा कारणीभूत असल्याचे समजते.