नवी मुंबई : वेगवेगळ्या गृहप्रकल्पांत घर खरेदी केलेल्या व्यावसायिकाला घराचा ताबा न देता १ कोटी ४७ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी मोनार्च कंपनीवर सीबीडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराने २०११ मध्ये सहा घरांच्या खरेदीसाठी पैसे दिले असून, अद्याप त्यांना घराचा ताबा दिलेला नसून कंपनीचे कार्यालयही बंद अवस्थेत आहे.
सीवूड परिसरात राहणारे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक सियाराम गर्ग हे २०११ मध्ये घर खरेदीच्या प्रयत्नात होते. यावेळी त्यांनी मोनार्च कंपनीच्या सीबीडी कार्यालयात जाऊन गोपाळ ठाकूर, हसमुख ठाकूर व रामनिवास अग्रवाल यांच्याकडे घरासंदर्भात चौकशी केली होती.
यावेळी मोनार्च कंपनीच्या वेगवेगळ्या प्रकल्पांची माहिती घेऊन त्यांनी सहा घरांच्या खरेदीसाठी १ कोटी ४७ लाख रुपये दिले होते.
तीन आरोपींवर गुन्हा दाखल
पैसे देऊन अद्यापपर्यंत त्यांना कोणत्याच घराचा ताबा दिलेला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गर्ग यांनी सीबीडी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार गोपाळ ठाकूर, हसमुख ठाकूर व रामनिवास अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.