मलेशियन कंपनीची सव्वा कोटीची फसवणूक, साखर खरेदीच्या व्यवहारात लावला चुना
By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 23, 2023 18:37 IST2023-04-23T18:36:42+5:302023-04-23T18:37:37+5:30
याप्रकरणी सानपाडा पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

मलेशियन कंपनीची सव्वा कोटीची फसवणूक, साखर खरेदीच्या व्यवहारात लावला चुना
नवी मुंबई : मलेशियन कंपनीला मागणीप्रमाणे साखर पुरवण्याची हमी देऊन आगाऊ सव्वा कोटी रुपये घेऊन फसवणूक झाली आहे. सानपाडा येथे कार्यालय थाटून अज्ञात व्यक्तींनी हा प्रकार केला आहे. याप्रकरणी सानपाडा पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
मलेशिया येथे राहणाऱ्या मुगामी कुंजिकनन यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांची मलेशियात साखर आयात कंपनी असून ते भारतासह इतर देशातून साखर मागवून मलेशियामध्ये पुरवतात. गतवर्षी त्यांच्या नेमीच्या ट्रेडरव्यतिरिक्त इतर ट्रेडर्सकडून साखरेच्या पुरवठ्याबाबत चौकशीसाठी ऑनलाईन जाहिरात दिली होती. त्यावरून सानपाडा येथील ग्रॉसली इम्पोर्ट नावाच्या कंपनीने त्यांना ईमेल करून त्यांच्याकडे क्रिस्टल व्हाईट साखर उपलब्ध असल्याचे सांगितले होते. त्याशिवाय गडहिंग्लज येथील एका साखर कारखान्याचे लेटरहेड देखील दाखवले होते. त्यानुसार मुगामी यांनी त्यांच्यासोबत १५ कोटी ६१ लाखात ४,०५० मेट्रिक टन साखरेचा व्यवहार ठरवला होता. यासाठी संबंधितांनी त्यांना दहा टक्के रक्कम आगाऊ मागितली असता त्यांनी संबंधितांच्या बँक खात्यात १ कोटी ९ लाख रुपये पाठवले होते. मात्र त्यानंतर सातत्याने वेगवेगळ्या कारणांनी त्यांना साखर पाठवण्याचे टाळले जात होते. यामुळे त्यांना संशय आल्याने मुंबईत राहणाऱ्या नातेवाईकामार्फत कार्यालयाला भेट दिली असता कार्यालय बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे झालेल्या फसवणूक बाबत त्यांनी मलेशियन पोलिसांकडे तक्रार केली असता सानपाडा येथून गुन्ह्याची सूत्रे हलल्याने सानपाडा पोलिसांकडे त्यांनी नातेवाईकामार्फत तक्रार केली आहे. त्याद्वारे दुराईराज गणपथी, गणपथी शर्मिला रोशन व गणपथी शर्मिला नावाच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.