बाप्पाच्या स्वागतासाठी फुलल्या बाजारपेठा
By Admin | Updated: September 14, 2015 04:16 IST2015-09-14T04:16:01+5:302015-09-14T04:16:01+5:30
बाप्पाचे माहेरघर म्हणून पेणची ख्याती असली तरी पनवेल तालुक्यातील मूर्तिकारांकडून दरवर्षी हजारो गणेशमूर्ती साकारल्या जातात.

बाप्पाच्या स्वागतासाठी फुलल्या बाजारपेठा
प्रशांत शेडगे, पनवेल
बाप्पाचे माहेरघर म्हणून पेणची ख्याती असली तरी पनवेल तालुक्यातील मूर्तिकारांकडून दरवर्षी हजारो गणेशमूर्ती साकारल्या जातात. यंदा जवळपास तीस हजारांहून अधिक गणेशमूर्ती मूर्तिकारांनी साकारल्या असून त्यातून तब्बल ५ ते २0 कोटींची उलाढाल अपेक्षित आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक छोटे-मोठे कारागीर सध्या बाप्पाच्या मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्यात मग्न आहेत.
कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. पनवेल हे कोकणचे प्रवेशद्वार मानले जात असल्याने उत्सवात हा परिसरातही मोठी धामधूम असते. पनवेल परिसरातही ३0 पेक्षा जास्त कारखाने आहेत. भिंगारी येथे बाप्पाच्या मूर्ती तयार केल्या जातात. कुंभारवाडा येथे द्वारकानाथ कुंभार यांच्या मालकीचा कारखाना असून तिथे दीपक पाटील यांच्यासह काही कलाकारांची मूर्ती घडवण्यासाठी सध्या लगबग सुरू आहे. त्यांची सातवी पिढी हा परंपरागत व्यवसाय करीत असल्याचे कुंभार सांगतात. या ठिकाणाहून राजापूर, सातारा, कोल्हापूर त्याचबरोबर रायगड जिल्ह्यात बाप्पांना मागणी आहे. पेशवेकाळापासून ते एकाच साच्याचे गणपती तयार करतात. त्याचबरोबर कुभार्ली येथे कुंभार समाजाचे तीन कुटुंब बाप्पाची विविध रुपे साकारण्यात मग्न आहेत.
नाशिक ढोल सज्ज
बाप्पाचे जल्लोषात आणि उत्साहात स्वागत करण्यासाठी परिसरातील ढोल-ताशा पथक सज्ज झाले आहेत. गेल्या एक दीड महिन्यांपासून या पथकांनी कसून सराव केला आहे.
प्रशासनाने डीजेवर बंदी घातल्यानंतर ढोल-ताशा पथकांची मागणी वाढली आहे. त्यानुसार नाशिक ढोल, पुणे ढोल, बँजो पथक, ब्रास बँडला भक्तांकडून पसंती देण्यात येत असून आगाऊ नोंदणीही सुरू झाली आहे.
कळंबोली परिसरात संध्याकाळाच्या वेळात सध्या नाशिक ढोल पथकाचा जोरदार सराव सुरू आहे. तासाला १५०० ते ५,०००पर्यंतचा दर या पथकाकडून आकारले जातात. एका पथकात सात, दहा, पंधरा किंवा वीस अशा संख्येने ढोल लावून वाद्यांच्या गर्जनेसाठी पथके सज्ज झाली आहेत.
आकर्षक लाकडी पाटांना वाढली मागणी
तळोजा : गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी लागणाऱ्या लाकडी पाटांना सध्या भक्तांकडून मोठी मागणी आहे. काही ठिकाणी आॅर्डरनुसार दर्जेदार, लहान-मोठे पाट बनवून दिले जात आहेत. बाप्पाच्या आरासीत पाटाला विशेष महत्त्व आहे. बाप्पाची मूर्ती उभी असो वा आसनस्थ, तिची प्रतिष्ठापना करण्यासाठी पाट हा लागतोच.
पारंपरिक लाकडी पाटांना मागणी असली तरी सध्या स्टीलचे, लोखंडी पाटही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या पाटांची किंमत त्यांच्या आकारानुसार १५० ते ५,००० रुपयांपर्यंत आहेत.
उरणमध्ये ५० लाखांची उलाढाल
उरण : चिरनेर, करंजा, चाणजे, बोकडवीरा आदी परिसरात छोटे-मोठे गणेशमूर्ती घडविण्याचे तब्बल २५ कारखाने आहेत. या २५ कारखान्यांतून गणेशोत्सवाच्या काळात सुमारे साडेसात हजार गणेशमूर्ती तयार करून बाजारपेठेत पाठविल्या जातात. तीन पिढ्यांची परंपरा असलेल्या या गणेशमूर्ती विक्रीच्या व्यवसायातून दरवर्षी ५० लाखांची उलाढाल होते. या व्यवसायावर कारखान्यात काम करणाऱ्या ४०० कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो.
गणेशोत्सव प्रारंभ होण्यास अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे आॅडरींच्या मूर्ती वेळेवर ग्राहकांना देण्यासाठी मूर्तिकार, कारागीर गणेशमूर्ती घडविण्यात मग्न झालेत. त्यांचे हात मूर्ती घडविण्याच्या कामात यंत्रवत वेगाने लागलेत.
शाडूच्या गणेशमूर्तींसाठी १५० वर्षांची परंपरा असलेले चिरनेर येथील कलानगर हे नाव आता काही वर्षांपासून प्रसिध्दीस येऊ लागले आहे. या ऐतिहासिक चिरनेरमध्येच कलानगर वसलंय. ३० ते ४० कुटुंबीयांचे कलानगर. गणेशमूर्ती घडविणारे ६० मूर्तिकार कलानगरात आहेत. त्यामुळे प्रत्येक घरात गणेशमूर्ती बनविल्या जातात.
मूर्ती घडविण्यासाठी लागणारी शाडूची माती, रंग आणि कारागिरांच्या मोबदल्यात प्रत्येक वर्षी ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाल्याने मूर्तीच्या किंमती वाढल्या आहेत. चिरनेरमधून श्रींच्या मूर्तींना रायगड, ठाणे, मुंबई आणि इतर भागातून मोठी मागणी आहे. ग्राहकांच्या आॅर्डरप्रमाणेच श्रींच्या मूर्ती तयार केल्या जातात. त्यामुळे ग्राहक स्वत: येऊन कारखान्यातून श्रींच्या मूर्ती घेऊन जात आहेत. (वार्ताहर)