ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 12:04 IST2025-09-12T11:58:11+5:302025-09-12T12:04:41+5:30

Navi Mumbai Airport Opening Date: बहुप्रतिक्षित अशा नव्या नवी मुंबई विमानतळावर हवाई वाहतूक सुरू होण्याला मुहूर्त मिळाला आहे. सप्टेंबर अखेरीस या विमानतळावरून पहिले विमान झेपावणार आहे.

First flight will take off from Navi Mumbai airport by the end of September, the face of the city will change; Preparations in full swing | ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू

ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू

नवी मुंबई : संपूर्ण देशवासीयांना प्रतीक्षा असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनाच्या उंबरठ्यावर आहे. सप्टेंबर महिन्याअखेरीस विमानतळाचे उद्घाटन करण्याचे संबंधित यंत्रणांचे नियोजन असल्याबाबत प्रसिद्धपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यादृष्टीने प्राथमिक तयारी सुरू केली आहे. 

या विमानतळामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळावरील ताण कमी होणार असून, मुंबईसह नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि कोकणातील प्रवाशांना थेट दिलासा मिळणार आहे.

नवी मुंबईच्या पनवेलजवळील उलवे नोडमध्ये १,१६० हेक्टरवर उभारलेल्या या विमानतळाची वार्षिक क्षमता तब्बल ९ कोटी प्रवाशांची आहे. या विमानतळाला अत्याधुनिक पायाभूत सुविधांसह सक्षम दळवळण यंत्रणा उपलब्ध केल्या आहेत. 

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, गोवा हायवे आणि जेएनपीटी पोर्टच्या अगदी जवळ असल्याने नागरिकांचा प्रवास सोपा होणार आहे. याशिवाय मुंबई ट्रान्स हार्बर लिंक-अटल सेतू हा पूल खरा गेमचेंजर ठरणार आहे.

आधुनिक केंद्रासाठी प्रयत्न

सरकारकडून या प्रकल्पाला वाहतुकीचे आधुनिक केंद्र बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बेलापूर-पेन्धर मेट्रो लाईन उलवेपर्यंत वाढवली जाणार आहे.

पनवेल स्थानकाला रिजनल हब म्हणून विकसित करण्याची योजना आहे. पुणे व कोकणातील प्रवाशांसाठी थेट शटल सेवा उपलब्ध होणार आहे.

मुंबई, ठाण्याहून खास बस

एमएसआरटीसीकडून ठाणे, वाशी, दादर, पनवेलहून एअरपोर्ट एक्सप्रेस बस सुरू करण्याचे नियोजन आहे. इलेक्ट्रिक बसला यामध्ये विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.

गुंतवणुकीसह रोजगाराची संधी

सिडकोकडून ९ किमीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारला जात आहे. तो थेट टर्मिनलला जोडला जाणार आहे. खारघर, उलवे, पनवेलमध्ये टाउनशिप, बिझनेस पार्क लॉजिस्टिक हबला वेग आल्यामुळे रोजगार, गुंतवणुकीच्या संधी निर्माण होणार आहेत.

अर्थव्यवस्थेचा नवा टप्पा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून दुबई, लंडन, न्यूयॉर्कप्रमाणे मुंबईसुद्धा आता दोन विमानतळांच्या सोयीने मल्टी-एअरपोर्ट सिस्टममध्ये प्रवेश करणार आहे.

मुंबईकरांसाठी हे फक्त विमानतळ नसून, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी नवा टप्प ठरणार आहे, असे सिडको आणि अदानी समूहाने म्हटले आहे.

बहुआयामी कनेक्टिव्हिटी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी बहुआयामी कनेक्टिव्हिटी विकसित केली जात आहे-त्यामुळे रस्ता, रेल्वे व जलमार्ग या सर्व माध्यमांतून विमानतळाला थेट प्रवेश मिळेल. तसेच प्रवाशांना सहज व अखंड प्रवासाची सोय होईल.

मुंबई महानगर प्रदेशाबरोबरच ठाणे, पुणे व नाशिकमधूनही सहज पोहोचता येणार आहे, असे अदानी समूह विकसित करीत असलेल्या नवी मुंबई इंटरनॅशनल प्रा. लि. कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

Web Title: First flight will take off from Navi Mumbai airport by the end of September, the face of the city will change; Preparations in full swing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.