तळोजा कारागृहात कैद्यावर जीवघेणा हल्ला; उपचाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

By सूर्यकांत वाघमारे | Published: November 9, 2023 05:23 PM2023-11-09T17:23:50+5:302023-11-09T17:27:13+5:30

तळोजा कारागृहात असलेल्या कैद्याला जेल कर्मचाऱ्यांनी हल्ला घडवून आणून मारहाण केल्याचा आरोप कैद्याच्या बहिणीने केला आहे.

Fatal attack on prisoner in Taloja Jail | तळोजा कारागृहात कैद्यावर जीवघेणा हल्ला; उपचाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

तळोजा कारागृहात कैद्यावर जीवघेणा हल्ला; उपचाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

नवी मुंबई : तळोजा कारागृहात असलेल्या कैद्याला जेल कर्मचाऱ्यांनी हल्ला घडवून आणून मारहाण केल्याचा आरोप कैद्याच्या बहिणीने केला आहे. तर मागील एक महिन्यापासून कैदी जखमी अवस्थेत असतानाही त्याच्या उपचाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. २०१८ मध्ये झालेल्या मारहाणीचे पुरावे न्यायालयापुढे सादर करू नये यासाठी हि मारहाण झाल्याचा आरोप कैद्याच्या बहिणीने केला आहे. 

जेलमध्ये सुविधा मिळवण्यासाठी पैसे मागितल्या जात असल्याच्या तक्रारी अनेकदा येत असतात. त्यातूनच पैसे द्यायचे बंद केल्याने जोरावर बलकार सिंह या कैद्याला मारहाण झाल्याची घटना तळोजा कारागृहात घडली होती. याप्रकरणी २०१८ मध्ये संबंधित जेल अधिकारी, कर्मचारी यांच्यावर खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हे प्रकरण पनवेल न्यायालयात सुरु असल्याने न्यायालयापुढे मारहाणीचे पुरावे सादर करू नयेत यासाठी पुन्हा कैद्याला मारहाणीचा प्रकार घडला आहे. कैदी जोरावर याची बहीण वरिन्दकौर सिंह यांनी हा आरोप केला असून यासंबंधी जेल प्रशासन, पोलिस महासंचालक यांच्याकडे देखील तक्रार केली आहे. जेल अधिकाऱ्यांनी काही कैद्यांना हाताशी धरून आपल्यावर हल्ला घडवून आणल्याचे जोरावर याने बहीण भेटीसाठी कारागृहात आली असता सांगितले.

या मारहाणीत त्याला गंभीर दुखापत झालेली असतानाही जाणीवपूर्वक रुग्णालयात नेले जात नाही. तसेच दाखल गुन्ह्यातले पुरावे न्यायालयापुढे सादर केल्यास आपल्यासह बहिणीवर देखील जीवघेणा हल्ला केला जाईल अशी धमकीही दिली असल्याचे त्याने सांगितले आहे.

दरम्यान, एक महिना उलटूनही त्याच्या उपचारात हलगर्जी करून त्याला मृत्यूच्या दाढेत ढकलले जात असल्याची खंत वरिन्दकौर यांनी व्यक्त केली आहे. तर जोरावर याची अवस्था पनवेल न्यायालयासमोर आली असता त्याला उपचार करण्याचे न्यायाधीशांनी सूचित करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचाही आरोप वरिन्दकौर सिंह यांनी केला आहे. या घटनेवरून कारागृहातील कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. 

Web Title: Fatal attack on prisoner in Taloja Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.