मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 23:51 IST2020-02-27T23:51:02+5:302020-02-27T23:51:06+5:30
सामाजिक संघटनांचा सहभाग; नवी मुंबईमध्ये सह्यांची मोहीम

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी उपोषण
नवी मुंबई : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी नवी मुंबईमधील साहित्यप्रेमी नागरिकांनी वाशीतील शिवाजी चौकात उपोषण केले. या प्रश्नाकडे शहरवासीयांचेही लक्ष जावे, यासाठी हे आंदोलन करण्यात आले असून सह्यांची मोहीमही सुरू करण्यात आली आहे.
ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील २७ संघटनांचे ‘मराठीच्या भल्यासाठी’ नावाचे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून व इतर साहित्यप्रेमी संस्थांच्या वतीनेही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी चळवळ उभी केली जात आहे. याचाच भाग म्हणून नवी मुंबईमधून एक लाख नागरिकांच्या सह्या घेऊन निवेदन तयार केले जाणार आहे. आतापर्यंत १८ हजार जणांच्या सह्या झाल्या आहेत. मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाचे पदाधिकारी व इतर नागरिकांनी गुरुवारी वाशीतील शिवाजी चौकामध्ये एक दिवसाच्या उपोषणाचे आयोजन केले होते. मराठी भाषेसाठीची चळवळ सर्वांपर्यंत पोहोचवावी. यासाठी सुरू असलेल्या चळवळीमध्ये सर्वांचे योगदान मिळावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
उपोषणामध्ये सुभाष कुलकर्णी, नीलेश पालेकर, परशुराम ठाकूर, मधुकर राऊळ, माधव ठाकूर, दिनकर नवरे, काळुराम वरे, दीपक पाटील, प्रवीण पडवळकर, सुभाष बागवे व इतर मान्यवर सहभागी झाले होते.