कारंज्याचे झाले डम्पिंग ग्राउंड
By Admin | Updated: September 1, 2015 04:47 IST2015-09-01T04:47:44+5:302015-09-01T04:47:44+5:30
महापालिकेने वाशीतील शिवाजी चौकाचे सुशोभीकरण करून तीन ठिकाणी कारंजे बसविले आहेत. काही दिवसांपासून कारंजे बंदच असून रस्ता दुरुस्त करणाऱ्या

कारंज्याचे झाले डम्पिंग ग्राउंड
नवी मुंबई : महापालिकेने वाशीतील शिवाजी चौकाचे सुशोभीकरण करून तीन ठिकाणी कारंजे बसविले आहेत. काही दिवसांपासून कारंजे बंदच असून रस्ता दुरुस्त करणाऱ्या ठेकेदाराने दूषित पाणी व कचरा टाकण्यासाठी त्याचा वापर सुरू केला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने वाशीतील शिवाजी चौकाचे सुशोभीकरण केले आहे. चौकाच्या एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देणारी शिल्प तयार केली आहेत. दुसऱ्या बाजूला नागरिकांना कार्यक्रम साजरे करण्यासाठी व छोटे प्रदर्शन भरविण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. चौकामध्ये तीन ठिकाणी कारंजे बसविण्यात आले आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून कारंजे बंदच आहेत. या ठिकाणी रोडवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू आहे. ठेकेदाराने रोडवरील गढूळ पाणी व कचरा उचलून कारंजामध्ये टाकण्यास सुरवात केली आहे. यामुळे कारंजे खराब
झाले आहेत. गाळ कारंजासाठी बसविण्यात आलेल्या उपकरणामध्ये गेल्यामुळे त्याची दुरुस्ती करावी लागणार आहे.
महापालिकेच्याच ठेकेदाराने चौकातील कारंजाचे डम्पिंग ग्राउंड बनविले आहे. चौकाचे विद्रूपीकरण केले असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)