- नामदेव मोरेनवी मुंबई - मराठा आरक्षणासाठीनवी मुंबईत दाखल होणाऱ्या आंदोलकांसाठी पुन्हा एकदा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आधार ठरली आहे. येथील कांदा, बटाटा व फळमार्केटमध्ये आंदोलकांच्या तात्पुरत्या वास्तव्याची सोय केली जाणार असून, अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महिला आंदोलक आल्यास त्यांची सोय फळमार्केट येथील नवीन इमारतीत केली जाणार आहे. आंदोलकांना पाणी, प्रसाधनगृहे या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली जानेवारी २०२४ मध्ये झालेल्या आंदोलनात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची भूमिका महत्त्वाची ठरली होती. राज्यातून आलेल्या लाखो आंदोलकांची येथे सोय केली होती. येथील व्यापारी, कामगार यांनी जेवणासह सर्व व्यवस्था केल्यामुळे कोणाचीही गैरसोय झाली नव्हती. यावेळेसही बाजार समितीने आंदोलकांना आधार दिला आहे.
पाचही मार्केट सुरू राहणारयापूर्वीच्या आंदोलनाच्या वेळी बाजार समितीमधील पाच मार्केट बंद ठेवले होते. मात्र, या वेळेस सर्व मार्केट सुरू राहणार आहेत.
राज्यातून मराठा समाज मुंबईत जाणार आहे. त्यापूर्वी काही तास आंदोलक नवी मुंबईत थांबण्याची शक्यता आहे. त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी बाजार समितीत व्यवस्था करण्यात येणार आहे.- शशिकांत शिंदे, माथाडी नेते
गाडीत जेवण बनविण्याचे व मुक्कामाचे सर्व साहित्य आणले आहे. यावेळेस आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही. निर्धार पक्का आहे. कितीही कष्ट पडले तरी आंदोलन सुरू राहील. - परमेश्वर पासले, बार्शी, सोलापूर
महिनाभर मुंबईत राहावे लागले तरी तशी तयारी करून आलो आहे. आता आरक्षणानंतरच मागे हटणार. प्रत्येक गावातून मराठा समाज मुंबईत आला आहे.- संतोष दवंगे, मनूर, वैजापूर