नवीन वर्षापासून सेवांचा विस्तार, आयुक्तांनी केली रुग्णालयाची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 00:05 IST2020-12-22T00:05:23+5:302020-12-22T00:05:56+5:30

Navi Mumbai : ऐरोली आणि नेररळ येथील ररग्णालयाच्या इमारतीत १ जानेवारीपासून आयसीयू व मेडिसीन वॉर्ड सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.

Expansion of services from the new year, the commissioner inspected the hospital | नवीन वर्षापासून सेवांचा विस्तार, आयुक्तांनी केली रुग्णालयाची पाहणी

नवीन वर्षापासून सेवांचा विस्तार, आयुक्तांनी केली रुग्णालयाची पाहणी

नवी मुंबई : नेरुळ व ऐरोली येथील रुग्णालयांच्या इमारतीत सर्वसाधारण रुग्णालय सुरू करण्याच्या दृष्टीने महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. त्याअनुषंगाने संबंधित विभागाला दिलेल्या निर्देशांचे पालन झाले आहे की, नाही याची तपासणी करण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सोमवारी नेरुळ येथील रुग्णालयाच्या इमारतीला अचानक भेट देऊन पाहणी केली.
ऐरोली आणि नेररळ येथील ररग्णालयाच्या इमारतीत १ जानेवारीपासून आयसीयू व मेडिसीन वॉर्ड सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाला काही सूचना केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी झाली आहे की, नाही याची तपासणी बांगर यांनी यावेळी केली. तसेच सध्या सुरू असलेल्या आरोग्य सेवांची पाहणी करताना या ठिकाणी नेत्रचिकित्सा, कान-नाक-घसा तपासणी, त्वचाविकार, मानसोपचार, मेडिसीन या बाह्यरुग्ण सेवाही सुरू करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. त्यानुसार १ जानेवारीपर्यंत या बाह्यरुग्ण सेवाही सुरू करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ पूर्तता करण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले .
ऐरोलीप्रमाणेच नेरुळ रुग्णालयातही कोविडपश्चात उपचार केंद्र सुरू असून त्याची माहिती नागरिकांना होण्यासाठी व्यापक स्वरूपात प्रसिध्दी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असली तरी कोरोना संसर्गानंतर वैद्यकीय सेवेची गरज असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अशा नागरिकांसाठी महापालिकेची उपचार सेवा उपलब्ध असल्याची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
या पाहणी दौऱ्यात काही फायर एक्स्टिंग्युशर या अग्निशमन उपकरणाचा वापर कालावधीची मुदत उलटून गेल्याचे निदर्शनास आले. याविषयी बांगर यांनी नाराजी व्यक्त करीत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. बालरोग वॉर्डमध्ये दाखल होणारी रुग्णसंख्या कमी दिसत असून अधिक चांगल्या रुग्णसेवेवर भर देण्याच्या सूचना केल्या. रुग्णालयाच्या रेकॉर्ड रूमच्या सद्यस्थितीबाबत नाराजी व्यक्त करीत १५ दिवसात अभिलेख अधिनियमानुसार रेकॉर्ड रूम अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत.

दोन टप्प्यात विस्तार
१ जानेवारीला पुरुष व महिलांसाठी प्रत्येकी १५ बेड्सचे मेडिकल वॉर्ड व १० बेड्सचा आयसीयू वॉर्ड सुरू करण्यासाठी आवश्यक ती संपूर्ण कार्यवाही करण्याची जबाबदारी वैद्यकीय अधीक्षकांवर सोपविण्यात आली आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात १ फेब्रुवारीपासून सर्जिकल वॉर्ड व सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया सुरू करण्याचेही नियोजन असल्याचे आयुक्त बांगर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Expansion of services from the new year, the commissioner inspected the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.