४० किलो स्फोटके टाकली तरी चिनाब पुलाला धोका नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 07:31 IST2025-06-09T07:29:49+5:302025-06-09T07:31:49+5:30

Chenab Bridge: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उद्घाटन केलेला चिनाब नदीवरील पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षाही ३५ मीटर अधिक उंचीचा महाकाय पूल कोकण रेल्वे काॅर्पोरेशनने बांधला आहे.

Even if 40 kg of explosives are dropped, there is no threat to the Chenab Bridge | ४० किलो स्फोटके टाकली तरी चिनाब पुलाला धोका नाही

४० किलो स्फोटके टाकली तरी चिनाब पुलाला धोका नाही

- नारायण जाधव
नवी मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उद्घाटन केलेला चिनाब नदीवरील पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षाही ३५ मीटर अधिक उंचीचा महाकाय पूल कोकण रेल्वे काॅर्पोरेशनने बांधला आहे. तो बांधताना कोकण रेल्वेचे अधिकारी, तंत्रज्ञ, कर्मचाऱ्यांनी एकीकडे दहशतवादाचे सावट, तर दुसरीकडे नैसर्गिक  अडचणींचा सामना केला आहे. दहशतवादाचे सावट पाहून ४० किलो  स्फोटके टाकली तरी हा पूल सुरक्षित राहील, याची दक्षता घेतली आहे.

२००२-०३ सालापासून या पुलाच्या कामाला सुरुवात होऊन तो वेळेत पूर्ण होऊन उद्घाटनासाठी २०२५ चा जून महिन्याचा मुहूर्त साधावा लागला. कारण काम करताना भूगर्भातील हालचालींचे होत असलेले अडथळे, हवामानातील बदल आणि पुलाच्या पुनर्रचनेमुळे त्याचे बांधकाम पूर्ण होण्यास उशीर झाला.

हवामान, भूगर्भातील हालचालींसह भूकंपापासून कोणताही धोका या पुलाला होऊ नये यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातूनही अभ्यास करून कंत्राटदार कोकण रेल्वेच्या दीड ते दोन हजारांवर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम करून हा पूल बांधला. पुलाचे आकर्षण असलेल्या कमानीचा (आर्च) स्पॅन हा ४६७ मीटर आहे.  चिनाब नदीच्या पृष्ठभागापासून ३२० मीटर उंचीवर आणि १,३१५ मीटर लांबीच्या या नव्या स्टील आर्चवे पुलाचे काम २००४ मध्ये सुरू झाले होते. पुलाची मुख्य कमान ४६७ मीटर लांबीची असून, ती जगातील सर्वांत लांब कमानींपैकी एक आहे. त्यात १३.५ मीटर रुंदीचा डेक आहे, जो दोन रेल्वे ट्रॅकसाठी डिझाइन केला आहे. प्रकल्पाचे डिझायनिंग सल्लागार, डब्ल्यूएसपी फिनलंड यांनी टेकला स्ट्रक्चर्स सॉफ्टवेअरला निवडले होते.

१६ गावांमध्ये १२८ किलोमीटरचे रस्ते 
बोगदे आणि चिनाब पूल बांधण्यासाठी लागणारे साहित्य त्या भागांपर्यंत पोहोचणे गरजेचे होते. तेथील रस्त्यांची दुरवस्था पाहता तिथपर्यंत साहित्य पोहोचणे अशक्य होते. हे लक्षात घेऊन कोकण रेल्वेने सर्वप्रथम १६ गावांमधून १२८ किलोमीटरचे रस्ते बांधले. धरमकुंड येथील जुनाट पुलावरून साहित्य नेणे कठीण असल्याने ४० टन वजन नेता येईल, अशा प्रकारचा नवीन पूलसुद्धा त्यांनी बांधला. 

भूकंप, वादळासह दहशतवाद्यांपासून धोका होणार नाही याची खबरदारी 
चिनाब पूल आणि बनविण्यात येत असलेले बोगदे यांना भूकंपापासून कोणताही धोका नाही. ही दोन्ही कामे सुरू असलेल्या कटरा आणि कौरी परिसरात भूकंपाचे छोटे धक्के काही प्रमाणात बसतात. त्याची दक्षता घेऊन येथील पूल आणि बोगदे बनल्यानंतर ते सुरक्षित राहतील, याची काळजी कोकण रेल्वेने घेतली आहे. 

शिवाय दहशतवाद्यांपासूनही कोणता धोका होऊ नये, यासाठीही खबरदारी घेतली आहे. ४० किलोग्रॅम स्फोटक जरी या पुलावर टाकले तरी त्याला फारसा धक्का न लागता यावरून ट्रेन धावू शकते, असे त्याचे डिझाइन आहे.

नॉर्वेस्थित फोर्स टेक्नॉलॉजी लॅबोरेटरीने वाऱ्याचा वेग त्याचे परिणाम समजून घेण्यासाठी चाचण्या घेतल्या. हा पूल २६० किमी/ताशी वेगाने येणाऱ्या वाऱ्याला तोंड देण्यासाठी डिझाइन केला आहे.

Web Title: Even if 40 kg of explosives are dropped, there is no threat to the Chenab Bridge