नवी मुंबई : महापालिका चिंचपाडा झोपडपट्टीमध्ये बायोगॅससह वीजनिर्मिती प्रकल्प उभारणार आहे. यासाठी ७० लाख रुपये खासदार निधी व तब्बल ६२ लाख रुपये लोकसहभागातून उभारण्यात येणार आहेत. अशा प्रकारे उपक्रम राबविणारी नवी मुंबई पहिलीच पालिका ठरणार आहे. स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नवी मुंबई महापालिकेने शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून चिंचपाडा झोपडपट्टीमध्ये प्रत्येक घरामध्ये वैयक्तिक शौचालय उभारण्यात येत आहे. शौचालय उभारण्यासाठी शासन अनुदान देत असून जास्तीत जास्त नागरिकांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रभाग ७ चिंचपाडामध्ये वैयक्तिक शौचालय बांधण्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. वैयक्तिक शौचालयामधून निघणाऱ्या मैल्यावर प्रक्रिया करून बायोगॅस प्रकल्प व त्या माध्यमातून वीजनिर्मिती करणे प्रस्तावित करण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी पुढाकार घेतला आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी जवळपास १ कोटी ५६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यामधील ७० लाख रुपये ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या निधीमधून खर्च करण्यात येणार आहेत. उर्वरित ६२ लाख ६३ हजार रुपये स्वर्गीय नगरसेविका मीनाताई विजय चौगुले रहिवासी सेवा मंडळ या संस्थेच्या माध्यमातून खर्च केले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी २५ हजार लोकसंख्या गृहित धरण्यात आली आहे. ग्रे वॉटर टँक बांधणी, पाण्यासाठी टाकी बांधणे, अॅनारोबिक डायजेस्टर बांधणे, फिड हँडलिंग रूम बांधणे, बलून रूम बांधणे, इंजिन रूम बांधण्यात येणार आहे. महापालिकेच्या प्रस्तावित बायोगॅस प्रकल्पातून ४०० एम३ एवढा बायोगॅस व ५०० केएचडब्ल्यू एवढी वीजनिर्मिती होणार आहे. या विजेचा वापर परिसरातील पथदिव्यांसाठी केला जाणार आहे. बायोगॅस युनिटच्या स्थापत्यविषयक कामे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. नवी मुंबई महापालिकेने यापूर्वी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मलनि:सारण केंद्र उभारली आहेत. शास्त्रोक्त पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन करणारी ही पहिली महापालिका असून आता घनकचरा, सांडपाणी व इतर टाकाऊ वस्तूंच्या वापरातून सामूहिक बायोगॅस युनिट उभारणारी ही पहिली महानगरपालिका ठरणार आहे. सर्वसाधारण सभेने या प्रस्तावास नुकतीच मंजुरी दिली आहे. (प्रतिनिधी)
चिंचपाड्यात बायोगॅससह होणार वीजनिर्मिती
By admin | Updated: March 22, 2017 01:40 IST