खाद्यतेल दरवाढीचा तडका; युद्धामुळे भावात १६ टक्के वाढ; कंटेनर, वाहतूक, साठवण आणि आयात खर्चामुळे बाजारभाव चढल्याचे उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 10:37 IST2026-03-18T10:37:08+5:302026-03-18T10:37:08+5:30
भारत हा जगातील सर्वाधिक खाद्यतेल वापरणाऱ्या देशांपैकी एक असून देशांतर्गत उत्पादन अपुरे पडत असल्याने मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून राहावे लागते. युद्धामुळे जागतिक व्यापार साखळी विस्कळीत झाली असून कंटेनर उपलब्धता, वाहतूक खर्च आणि साठवण खर्चात वाढ झाली आहे.

खाद्यतेल दरवाढीचा तडका; युद्धामुळे भावात १६ टक्के वाढ; कंटेनर, वाहतूक, साठवण आणि आयात खर्चामुळे बाजारभाव चढल्याचे उघड
नामदेव मोरे -
नवी मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर दिसू लागला आहे. गॅस टंचाईसोबतच खाद्यतेलाच्या दरातही लक्षणीय वाढ झाली असून सोयाबीन, पामतेल आणि सूर्यफूल तेलाच्या किमतीत १० ते १६ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
भारत हा जगातील सर्वाधिक खाद्यतेल वापरणाऱ्या देशांपैकी एक असून देशांतर्गत उत्पादन अपुरे पडत असल्याने मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून राहावे लागते. युद्धामुळे जागतिक व्यापार साखळी विस्कळीत झाली असून कंटेनर उपलब्धता, वाहतूक खर्च आणि साठवण खर्चात वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे. पामतेलाचे दर प्रती किलो १२३-१२५ रुपयांवरून थेट १४५ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
सूर्यफूल तेल १५८ रुपयांवरून १७२ रुपयांवर गेले असून सोयाबीन तेल १२८ रुपयांवरून १४५ रुपयांपर्यंत वाढले आहे. मात्र, देशांतर्गत उत्पादन होणाऱ्या शेंगदाणा व तीळ तेलाच्या दरात तुलनेने कमी वाढ झाली आहे. भारतामध्ये पामतेलाची आयात प्रामुख्याने इंडोनेशिया व मलेशिया येथून होते. सोयाबीन तेल अर्जेंटिना व ब्राझील येथून, तर सूर्यफूल तेल युक्रेन व रशिया येथून आयात केले जाते. युद्धामुळे या सर्व आयात मार्गांवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाल्याचे दिसत आहे.
खाद्यतेल दरवाढ (रु. किलो)
तेल पूर्वी आता
सूर्यफूल तेल १५८ १७२
सोयाबीन तेल १२८ १४५
पामतेल १२३ १४५
शेंगदाणा तेल १७० १७५
तीळ तेल २४० २५०
औद्योगिक मालाच्या दरात वाढ
केवळ खाद्यतेलच नव्हे तर इतर खाद्यपदार्थ व औद्योगिक मालाच्या दरातही वाढ झाली आहे. आयात-निर्यात व्यापारातील अनिश्चितता व वाढलेले लॉजिस्टिक खर्च हे दरवाढीचे प्रमुख कारण ठरत आहे.
वाहतूक खर्च वाढल्याचा परिणाम
युद्धाचा परिणाम जागतिक व्यापारावर झाला आहे. वाहतूक व इतर खर्च वाढल्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली आहे, अशी माहिती तरुण जैन, सचिव, अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी असोसिएशन यांनी दिली.