शहरातील पर्यावरणपूरक दाहिन्या धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:21 IST2020-07-29T00:21:44+5:302020-07-29T00:21:48+5:30
नवी मुंबई महापालिका प्रशासनाची उदासीनता : फक्त लाकडांचा पर्याय उपलब्ध

शहरातील पर्यावरणपूरक दाहिन्या धूळखात
योगेश पिंगळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : एकविसाव्या शहरातील सुनियोजित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात अंत्यविधीसाठी तयार करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक दाहिन्यांचा वापर केला जात नसल्याने, त्या धूळखात पडलेल्या आहेत. महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अंत्यविधीसाठी शहरात फक्त लाकडांचा पर्याय उपलब्ध असून, कोरोनासाख्या परिस्थितीही याच पर्यायाचा वापर केला जात आहे.
नवी मुंबई शहरातील प्रत्येक विभागात महापालिकेच्या माध्यमातून स्मशानभूमी बांधण्यात आल्या आहेत. पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी महापालिका आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून तुर्भे येथे डिझेल, नेरुळ येथे गॅस, तर करावे येथे इलेक्ट्रिक दाहिनीची निर्मिती करण्यात आली होती. या दाहिन्यांच्या निर्मितीसाठी खासगी सामाजिक संस्थांनी खर्च केला होता, परंतु या दाहिनींची महापालिकेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली नाही. त्यामुळे वापरही झाला नसल्याने पर्यावरणपूरक दाहिन्या वापराविना कालांतराने बंद अवस्थेत आहेत. करावे येथील मध्यवर्ती स्मशानभूमीतील पर्यावरणपूरक दाहिनी गेल्या वर्षी पुन्हा एका खासगी संस्थेच्या माध्यमातून सुरू करून गॅस दाहिनी साकारण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीत शहरात या एकमात्र पर्यावरणपूरक दाहिनीचा वापर केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने, तसेच पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी राज्यातील मुंबई, पुणे यासारख्या आदी महापालिकांमध्ये अंत्यविधीसाठी पर्यावरणपूरक दाहिन्यांचा वापर केला जात आहे, परंतु स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबई महापालिकेची करावे स्मशानभूमी वगळता, इतर सर्वच स्मशानभूमींमध्ये अंत्यविधीसाठी आजही फक्त लाकडांचाच पर्याय उपलब्ध आहे. महापालिकेच्या माध्यमातून अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड, मीठ, गोवºया, रॉकेल आदी साहित्य मोफत उपलब्ध करून दिले जाते. लाकडांचा वापर करून पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी करण्याची नागरिकांची मानसिकता असली, तरी काळानुरूप यात बदल होताना दिसत आहे. कोरोनासारख्या परिस्थिती पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यामुळे सुरक्षेला धोका आहे, परंतु पर्यावरणपूरक सुविधा उपलब्ध नसल्याने धोका पत्करून अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. लाकडांसाठी महापालिकेच्या माध्यमातून महिन्याला लाखो रुपये खर्च केले जात आहेत.
पर्यावरणशील शहर म्हणून विकसित होण्यासाठी प्रयत्न
च्नवी मुंबई शहर पर्यावरणशील शहर म्हणून विकसित होण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रयत्न केले जात आहेत.
च्कमी अंतरासाठी खासगी वाहनांचा वापर कमी व्हावा व सायकलसारख्या प्रदूषणमुक्त पर्यावरणाला प्राधान्य देण्याच्या अनुषंगाने महापालिकेने जनसायकल प्रणाली सुरू केली होती, परंतु अंत्यविधीसाठी पर्यावरणपूरक दाहिन्या विकसित करण्याकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे.
करावे येथील स्मशानभूमीमध्ये गॅस दाहिनी सुरू आहे. शहरात इतर ठिकाणीही पर्यावरणपूरक दाहिन्या निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.
- सुरेंद्र पाटील, शहर अभियंता, न.मुं.म.पा.