डम्पिंग ग्राउंडलगत अनधिकृत भंगार साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 23:24 IST2019-02-22T23:23:34+5:302019-02-22T23:24:09+5:30
तुर्भे एमआयडीसीमधील प्रकार

डम्पिंग ग्राउंडलगत अनधिकृत भंगार साठा
नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसी येथील डम्पिंग ग्राउंडलगत अनधिकृतपणे भंगाराचे गोदाम चालवले जात आहेत. त्याकरिता कुंपण घातलेल्या मोकळ्या भूखंडाचा बेकायदा वापरत होत असतानाही प्रशासनाची डोळेझाक होत आहे. मात्र, भंगारात साठवल्या जात असलेल्या ज्वलनशील वस्तूंमुळे परिसराला धोका निर्माण झाला आहे.
तुर्भे एमआयडीसी परिसरात अनधिकृत गोदाम वाढत आहेत. मोकळ्या भूखंडांसह बंद कंपन्यांच्या ठिकाणी गोदाम चालवले जात आहेत. मात्र, त्याकडे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने भंगार व्यावसायिकांच्या धंद्याला तेजी आल्याचे परिसरात पाहायला मिळत आहे. त्याकरिता कुंपण घातलेल्या भिंतींचा देखील उघडपणे वापर होऊ लागला आहे. असाच प्रकार तुर्भे एमआयडीसी येथील पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडलगत पाहायला मिळत आहे. त्याठिकाणी मोकळ्या मैदानाच्या भिंतीला शिडी लावून आतमध्ये जाण्याचा मार्ग तयार करण्यात आला आहे. त्याठिकाणी सात ते आठ अनधिकृत गोडाऊन चालवले जात आहेत. शहरात ठिकठिकाणावरून जमा केलेले भंगार व औद्योगिक परिसरातील टाकाऊ साहित्य जमा करून त्याठिकाणी ठेवले जात आहे. त्यामध्ये ज्वलनशील वस्तूंचाही समावेश असल्याने भविष्यात संपूर्ण परिसराला धोका उद्भवण्याची भीती शेकापचे जिल्हा कार्यालय सरचिटणीस गोविंद साळुंखे यांनी व्यक्त केली आहे.
अतिक्रमणाच्या विळख्यात गेलेला हा भूखंडावर गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे. त्यांच्याकडून पादचाºयांच्या जीविताला धोका उद्भवत असून अनेकांनी तशी भीती देखील व्यक्त केलेली आहे. यामुळे संबंधित प्रशासनाकडून अनधिकृत गोडाऊन हटवण्याची मागणी गोविंद साळुंखे यांनी केली आहे.