जयंत धुळप। लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील गोदाम म्हणून वापरण्यात येणारी दोन्ही सभागृहे येत्या दोन दिवसांत रिकामी करण्यात येतील, तसेच दोन लाख रुपयांचे थकीत भाडे तत्काळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण (बार्टी) संस्थेस अदा करण्यात येईल, असा शासकीय निर्णय महाडचे निवासी नायब तहसीलदार सचिन गोसावी यांनी कळविला आहे. याबाबतची माहिती स्मारकाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या बार्टीचे व्यवस्थापक प्रशांत धिवार यांनी ‘लोकमत’ला दिली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली आणि त्या निमित्ताने समता वर्ष पाळण्यात आले. परंतु याच वर्षात जिल्हा प्रशासनाने महाडच्या या राष्ट्रीय स्मारकातील दोन सभागृहांचा गोडावून म्हणून वापर करण्यास प्रारंभ केला गेल्याचे उघडकीस आल्यावर कोकण भवन आयुक्तालय, रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, महाड उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय आणि महाड तहसीलदार कार्यालय अशी शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यातच कोकण विभागीय महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख, प्रभारी जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा रायगड किल्ला दौरा असल्याने स्मारकाच्या बाबतच्या या विषयावरून महाड महसूल यंत्रणेत एकच धावपळ उडाली होती. तसेच दोन लाख रूपये देण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आहे.
डॉ. आंबेडकर स्मारकातील दोन्ही सभागृहे रिकामी होणार
By admin | Updated: May 25, 2017 02:03 IST