शहरातील १६ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार
By Admin | Updated: October 10, 2016 03:47 IST2016-10-10T03:47:47+5:302016-10-10T03:47:47+5:30
आयुक्तांनी नगरसेवक पद रद्द केल्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीच्या दिघा येथील तीन नगरसेवकांनी न्यायालयात धाव घेतली आहे

शहरातील १६ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार
नवी मुंबई : आयुक्तांनी नगरसेवक पद रद्द केल्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीच्या दिघा येथील तीन नगरसेवकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. सोमवारी याविषयी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने आयुक्तांना अधिकार असल्याचा निर्णय दिल्यास एकूण १६ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार राहणार आहे.
दिघा येथील अनधिकृत बांधकामप्रकरणी राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते व दीपा राजेश गवते यांचे नगरसेवकपद आयुक्तांनी रद्द केले होते. या निर्णयाला गवते कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आयुक्तांना अपात्र ठरविण्याचे अधिकार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली होती. न्यायालयाने आयुक्तांच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली होती. सोमवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. न्यायालय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयुक्तांना अपात्रतेचे अधिकार असल्याचा निर्णय झाल्यास भविष्यात अनेक नगरसेवकांचे पद धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबईमधील शिवसेनेच्या ९, भाजपाच्या २ व राष्ट्रवादी काँगे्रसच्या ५ नगरसेवकांविरोधात अतिक्रमण प्रकरणी तक्रारी करण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या दोन नगरसेवकांवर गुन्हेही दाखल झाले आहेत. शिवसेनेच्या दोन ज्येष्ठ नगरसेवकांचे पद रद्द करावे यासाठी महापालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. याविषयी २१ आॅक्टोबरला सुनावणी होणार असून दोन्ही नगरसेवकांना त्यांचे लेखी अथवा तोंडी म्हणणे मांडण्यासाठीचे पत्र देण्यात आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून अतिक्रमणाचा फटका कोणत्या राजकीय पक्षाला किती बसणार, नगरसेवकांचे पद जाणार का याविषयी चर्चा शहरात सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)