सत्तेत असताना आरक्षणाचा निर्णय घेताना हात थरथरत होते का; प्रवीण दरेकरांची शरद पवारांवर टीका
By नामदेव मोरे | Updated: September 10, 2023 16:49 IST2023-09-10T16:48:40+5:302023-09-10T16:49:04+5:30
मराठा आरक्षणावर स्वार होऊन सरकारला कोंडीत पकडण्याचा डाव आखला जात आहे.

सत्तेत असताना आरक्षणाचा निर्णय घेताना हात थरथरत होते का; प्रवीण दरेकरांची शरद पवारांवर टीका
नवी मुंबई: मराठा आरक्षणावर स्वार होऊन सरकारला कोंडीत पकडण्याचा डाव आखला जात आहे. आरक्षणाचे राजकारण केले जात आहे. जाणता राजा म्हणवणारे शरद पवार सत्तेत असताना आरक्षणाचा निर्णय घेण्यास त्यांचे हात थरथरत होते का अशी टिका आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून नवी मुंबईमधील माथाडी भवनमध्ये लाभार्थ्यांचा मेळावा आयोजीत केला होता. यावेळी प्रवीण दरेकर यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागीतला जात आहे. आरक्षणाच्या मुद्यावर स्वार होऊन सरकारला कोंडीत पकडण्याचे राजकारण केले जात आहे. राजकीय पोळी भाजून घेणारांपासून समाजाने सावध राहिले पाहिजे. स्वत:ला जाणता राजा म्हणवणारे शरद पवार आंदोलकांना भेटताना एक भुमीका घेतात व ओबीसी मेळाव्यात दुसरी भुमीका घेतात. यापुर्वी सत्तेत असताना व अनेक मराठा मुख्यमंत्री असताना आरक्षणाचा प्रश्न का सोडविला नाही. शरद पवार स्वत: राज्यात व केंद्रात सत्तेत होते. तेव्हा आरक्षणाचा प्रश्न सोडविताना त्यांचे हात थरथरत होते का अशा शब्दात त्यांनी टिका केली. मराठा समाजाला शिंदे, फडणवीस व अजीत पवार सरकारच आरक्षण देईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ओबीसींसाठी असणाऱ्या सर्व योजना मराठा समाजासाठीही लागू केल्या जाणार आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ६७२८९ नागरिकांना स्वत:च्या व्यवसाय उभारण्यासाठी ५ हजार कोटींचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. या कर्जावरील ५१३ कोटी रूपयांचा व्याज परतावा देण्यात आला आहे. सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील मुलांना स्पर्धा परिक्षांसाठी सहकार्य केले असे सांगितले. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना व आता उपमुख्यमंत्री म्हणून महामंडळासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिला. समाजाचे प्रश्न सोडविले असून त्यांच्यामागे ठाम उभे राहिले पाहिजे असे स्पष्ट केले. यावेळी महामंडळाच्या माध्यमातून स्वत:चा व्यवसाय उभारणाऱ्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. कार्यक्रमास सुरज बर्गे, अंकुश लांडगे व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुंबई ठाणेत ५ हजार उद्योजक घडविणार
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील मराठा बांधवांसाठी मुंबई मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली. प्रवीण दरेकर यांनी एमएमआर विभागातून ५ हजार उद्योजक घडविण्याचा संकल्प केला. मुंबई मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून यासाठी ५०० कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासनही त्यांनी दिले.