"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 06:16 IST2025-04-26T06:16:15+5:302025-04-26T06:16:55+5:30

एनसीबीच्या पथकाने गुरुनाथ यांच्याकडे चौकशी केली होती. शुक्रवारीसुद्धा त्यांना संपत्तीची कागदपत्रे घेऊन चौकशीला बोलावले होते. 

Developer Gurunath Chichkar commits suicide by shooting himself in Navi Mumbai | "आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य

"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य

नवी मुंबई - मुलांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने विकासक पित्याने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी किल्ले गावठाण येथे घडली. गुरुनाथ चिचकर, असे विकासकाचे नाव आहे. राहत्या इमारतीमधील कार्यालयात त्यांनी सकाळी स्वतःवर गोळी झाडली. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत मुलांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे पोलिसांकडून चौकशीसाठी बोलावणे होत असल्याच्या त्रासाला कंटाळल्याचा उल्लेख केला आहे.

गुरुनाथ चिचकर सकाळी ६च्या सुमारास राहत्या इमारतीखाली असलेल्या कार्यालयात आले. तेथे त्यांनी स्वतःला बंदिस्त करून गोळी झाडली.  चिचकर यांच्या नवीन व धीरज या मुलांवर ड्रग्ज तस्करीचे गुन्हे दाखल आहेत. एनसीबीने नुकत्याच केलेल्या सुमारे २०० कोटींच्या ड्रग्ज कारवाईत त्यांचा समावेश असल्याचा संशय आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने नेरूळमधून विदेशी गांजा पकडला होता. नवी मुंबईत विदेशी गांजा पाठविण्यामागे नवीन चिचकरचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. यामुळे एनसीबीच्या पथकाने गुरुनाथ यांच्याकडे चौकशी केली होती. शुक्रवारीसुद्धा त्यांना संपत्तीची कागदपत्रे घेऊन चौकशीला बोलावले होते. 

डायरीतही केली होती नोंद
गुरुनाथ यांचे व्यवसायानिमित्त राजकीय नेते व शासकीय अधिकाऱ्यांसोबत चांगले संबंध होते. परंतु मुलांमुळे पोलिसांच्या चौकशीला आपल्याला सामोरे जावे लागत असल्याची खंत त्यांना वाटत होती. तशी नोंदही त्यांनी त्यांच्या डायरीत करून ठेवल्याचे पोलिस सूत्रांकडून समजते. गुन्हेगार मुलांमुळे आपली प्रतिष्ठा धुळीस मिळत असल्याच्या नैराश्यात त्यांनी आत्महत्या केली.

..तर, मी सहन केले असते
चिचकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत एनसीबी, बेलापूर पोलिस यांचा त्रास सहन होत नसल्याचे लिहिले आहे. मी काही केले असते तर सहन केले असते; परंतु आणखी किती वेळ सहन करणार, असे लिहीत त्यांनी आपल्या आईला काळजी घेण्यास सांगत शिंदे साहेबांना (उपमुख्यमंत्री) चिठ्ठीद्वारे विनंती केली आहे, असेही लिहिले आहे. यावरून त्यांना चौकशीव्यतिरिक्त कोणता त्रास होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चिचकर यांच्या मुलांचा २०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात एनसीबी पथक शोध घेत आहे. यासाठी त्यांना चौकशीला बोलावले होते. मुलांमुळे पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागत असल्याचा मनस्ताप होत असल्याचे त्यांनी डायरीत नोंद केले आहे. मानसिक तणावात त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. - पंकज डहाणे, पोलिस उपायुक्त

Web Title: Developer Gurunath Chichkar commits suicide by shooting himself in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.