Despite the ban, the freight continued through the travels | बंदीनंतरही ट्रॅव्हल्समधून मालवाहतूक सुरूच
बंदीनंतरही ट्रॅव्हल्समधून मालवाहतूक सुरूच

सूर्यकांत वाघमारे 


नवी मुंबई : खासगी ट्रॅव्हल्समधून होणारी मालवाहतूक अद्यापही सुरूच असल्याचे दिसून येत आहे. पनवेल येथे एसटीच्या बसमध्ये बॉम्ब आढळल्याच्या घटनेनंतर तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी प्रवासी वाहतुकीच्या बसमधून मालवाहतुकीवर बंदी घातली होती. मात्र, आरटीओच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे अद्यापही ट्रॅव्हल्समधून मालवाहतूक होताना दिसत आहे.


पनवेलच्या आपटा बस आगारात उभ्या असलेल्या एसटीमध्ये आयईडी बॉम्ब आढळल्याची घटना मार्च महिन्यात घडली होती. सुदैवाने अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच ही बाब उघड झाल्याने संभाव्य हानी टळली. मात्र, भविष्यातील अशा दुर्घटना टाळण्यासाठी तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी खासगी तसेच राज्य परिवहनच्या प्रवासी बसमधून मालवाहतूक करण्यावर बंदी घातली होती. या निर्णयानंतर तत्काळ खासगी ट्रॅव्हल्सच्या बसमधून मालवाहतुकीला आळा बसणे आवश्यक होते; परंतु बंदीच्या निर्णयाला नऊ महिने उलटले तरीही निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसत आहे. ट्रॅव्हल्समधून होणाऱ्या या मालवाहतुकीला आरटीओसह संबंधित सर्वच प्रशासनाचे अर्थपूर्ण छुपे पाठबळ मिळत असल्याची दाट शक्यता आहे. परिणामी, प्रवाशांचा जीव धोक्यात घालून ट्रॅव्हल्समधून मालवाहतूक केली जात आहे. त्यामध्ये कुरियरच्या मालासह कृषी माल व इतर साहित्यांचाही समावेश आहे. प्रवासी वाहतुकीसह मालवाहतूक करून दुहेरी नफा मिळवण्याच्या उद्देशाने बहुतांश ट्रॅव्हल्स चालवल्या जात आहेत. त्यांचे नवी मुंबईसह पनवेल, ठाणे व मुंबई परिसरात प्रवासी व माल भरण्याचे थांबेही ठरले आहेत.


ट्रान्सपोर्ट कंपनीद्वारे ट्रक अथवा कंटेनरमधून मालवाहतूक करण्यावर होणारा खर्च टाळण्यासाठी ट्रॅव्हल्समधून मालवाहतूक केली जात आहे. गतमहिन्यात नवी मुंबई पोलिसांनी ट्रॅव्हल्समधूनशहरात विक्रीसाठी आणलेला गांजा जप्त केला होता. नियमितपणे हा गांजा ट्रॅव्हल्समधून आणला जायचा हेही तपासात उघड झाले होते. त्याशिवाय ज्वलनशील पदार्थांसह दुचाकीचीही बसच्या डिकीमधून वाहतूक होताना दिसून येत आहे. तर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून वाहतूक करण्यावरही ट्रॅव्हल्सचालकांकडून भर दिला जात आहे.

अशाच प्रकारातून २०१६ मध्ये मुंबई-पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्स बस व कारच्या अपघातात १७ जण मृत पावले होते. तर इतरही छोटे-मोठे अपघात घडलेले आहेत. त्यामुळे ट्रॅव्हल्समधून मालवाहतुकीवर घातलेल्या बंदीच्या निर्णयाची आरटीओकडून अंमलबजावणी केली जाणे आवश्यक आहे. त्याकरिता अवैध थांबे बंद करण्यासह ट्रॅव्हल्सची नियमित झडती घेतली जाणे आवश्यक आहे.

Web Title: Despite the ban, the freight continued through the travels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.