रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 05:18 IST2025-07-07T05:18:05+5:302025-07-07T05:18:28+5:30
नेरूळनंतर पुढे जाण्यासाठी इतर मार्गावरून लोकल उपलब्ध न झाल्याने प्रवासी स्थानकातच खोळंबून राहिले. यावेळी अनेकांनी रिक्षा, बस आणि अन्य वाहनांचा पर्याय निवडून घर गाठल्याचे दिसून आले.

रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
नवी मुंबई : हार्बर मार्गावर मेगा ब्लॉकदरम्यान रेल्वेचे दुरुस्ती इंजिन रुळावरून घसरल्याचा प्रकार सीवूड येथे घडला. यामुळे हार्बर मार्गावरील वाशी-बेलापूरदरम्यानची वाहतूक रात्री ९:३० वाजेपर्यंत बंद ठेवण्याची नामुष्की रेल्वे प्रशासनावर आली होती. मेगा ब्लॉक संपण्याआधीच हा प्रकार झाल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.
नेरूळनंतर पुढे जाण्यासाठी इतर मार्गावरून लोकल उपलब्ध न झाल्याने प्रवासी स्थानकातच खोळंबून राहिले. यावेळी अनेकांनी रिक्षा, बस आणि अन्य वाहनांचा पर्याय निवडून घर गाठल्याचे दिसून आले. दुरुस्ती इंजिन पुन्हा रुळावर आणण्यासाठी संध्याकाळी उशिरापर्यंत काम सुरू होते. या कालावधीत हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वाशी आणि बेलापूर ते पनवेलदरम्यान विशेष गाड्या चालवण्यात आल्या. ट्रान्स हार्बर मार्गावरून येणाऱ्या गाड्याही नेरूळपर्यंतच धावत असल्याने प्रवाशांना पनवेलच्या दिशेने जाण्यासाठी या मार्गाचा पर्यायही उपलब्ध होऊ शकला नाही. या प्रकारामुळे नेमक्या किती गाड्यांवर परिणाम झाला, याची माहिती रात्री उशिरापर्यंत प्रशासनाकडून मिळाली नाही.
हार्बर रेल्वेने दुरुस्ती कामासाठी रविवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत मेगा ब्लॉक ठेवला होता. दुरुस्तीचे काम करत इंजिन सीवूड येथे आले असता त्याची काही चाके रुळावरून घसरली. नेमका मेगा ब्लॉक संपण्यापूर्वीच म्हणजे साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडल्याने पनवेलकडे जाणाऱ्या मार्गावर अडथळा निर्माण झाला.