विमानतळबाधित वाघिवलीचे स्थलांतर न करण्याचा निर्णय; सिडकोची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:31 PM2019-11-20T23:31:03+5:302019-11-20T23:31:10+5:30

ग्रामस्थांच्या अवास्तव मागण्यांचा फटका

Decision not to relocate airport-bound Waghwali; The role of CIDCO | विमानतळबाधित वाघिवलीचे स्थलांतर न करण्याचा निर्णय; सिडकोची भूमिका

विमानतळबाधित वाघिवलीचे स्थलांतर न करण्याचा निर्णय; सिडकोची भूमिका

Next

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी स्थलांतरित होणाऱ्या दहा गावांत वाघिवली गावाचाही समावेश आहे. हे गाव विमानतळ गाभा क्षेत्रात येत नसले तरी गाभा क्षेत्राला लागूनच आहे. वाघिवली हे दहा गावांपैकी एक असल्याने स्थलांतरानंतर पुनर्वसनाचे सर्व फायदे येथील ग्रामस्थांना लागू होणार आहेत. मात्र, येथील ग्रामस्थांच्या अवास्तव मागण्यांमुळे या गावाचे स्थलांतर न करण्याचा निर्णय सिडकोने घेतल्याचे समजते. तसे झाल्यास येथील ग्रामस्थांना पुनर्वसन पॅकेजच्या लाभापासून वंचित राहवे लागणार आहे.

वाघिवली गावातील १५६ कुटुंबांपैकी आतापर्यंत जवळपास ९० कुटुंबांनी सिडकोने पुन:स्थापना केलेल्या जागेत स्थलांतर केले आहे. मात्र, अद्यापही सुमारे ६५ कुटुंबांनी सिडकोने दिलेल्या मुदतीत स्थलांतर केलेले नाही. या कुटुंबांनी पुनर्वसन व पुन:स्थापन पॅकेज व्यतिरिक्त विविध अटी-शर्ती व मागण्या सिडकोसमोर ठेवलेल्या आहेत. सर्व प्रकल्पबाधितांसाठी पुनर्वसन पॅकेज समान राहणार असल्याने त्यांच्या मागण्या मान्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सिडको व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

स्थलांतरित जागेत घराचे बांधकाम करण्यासाठी सिडकोने निश्चित केलेल्या १५०० रुपये प्रति चौ. फूट दराऐवजी अडीच हजार रुपये दर मिळावा, या सारख्या अनेक वाढीव मागण्या वाघिवली ग्रामस्थांकडून सिडकोकडे करण्यात आल्या आहेत. या ग्रामस्थांच्या वाढीव मागण्या मान्य करण्याचा कोणताच प्रश्न येत नाही. शिवाय, सदर गावाचे स्थलांतर नाही झाले तरी विमानतळ प्रकल्पात त्याचा कोणताही अडथळा येणार नसल्याची भूमिका सिडकोने घेतली आहे.

वारंवार विनंती करूनही वाघिवली गावातील उर्वरित कुटुंबे स्थलांतर न करण्याच्या भूमिकेवर अडून असल्याने अखेर या गावाचे स्थलांतर न करण्याचा निर्णय सिडकोने घेतल्याचे समजते. असे असले तरी वाघिवलीच्या प्रकल्पग्रस्तांना स्थलांतरासाठी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंतची एक अखेरची संधी देण्याचा निर्णयही सिडको व्यवस्थापनाने घेतल्याचे समजते.

Web Title: Decision not to relocate airport-bound Waghwali; The role of CIDCO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cidcoसिडको