पनवेल : रस्त्यावर सफाई करीत असताना भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने धडक दिल्याने पालिकेच्या सफाई कर्मचारी महिलेचा शुक्रवारी सकाळी ७.३0 वा जागीच मृत्यू झाला. अरुणा चंद्रकांत कदम असे या मृत महिलेचे नाव असून, पनवेल पालिकेतील घोट विभागात त्या सफाई कामगार म्हणून कार्यरत होत्या. कारचालक दिनेश भोईर याच्याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.अरुणा कदम या घोट कॅम्प येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले असा परिवार आहे. अपघाताची माहिती मिळताच पालिकेतील कर्मचारी, आ. बाळाराम पाटील, तसेच नगरसेवकांनी पालिका मुख्यालयाजवळ धाव घेतली.जून २०१८ साली सीताबाई जाधव या सफाई कर्मचाºयाचाही अपघाती मृत्यू झाला होता. या वेळी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सफाई कामगार, ड्रेनेज कामगार, अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांचा विमा उतरविण्याची मागणी केली होती. त्यानंतर पालिकेतील सर्व कामगारांचा विमा उतरविण्यात आला. मृत अरुणा कदम यांचाही १० लाखांचा विमा असल्याने ती रक्कम लवकरच त्यांच्या कुटुंबीयांना दिली जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली.
कारच्या धडकेत महिला सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 05:53 IST