बेलापूर स्थानकालगत आढळला मृतदेह

By Admin | Updated: July 8, 2015 00:44 IST2015-07-08T00:44:52+5:302015-07-08T00:44:52+5:30

बेलापूर रेल्वे स्थानकालगतच्या कचराकुंडीत मृतदेहाचे तुकडे आढळल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला. ४० ते ४५ वर्षांच्या व्यक्तीचा हा मृतदेह असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही

Dead found in Belapur station | बेलापूर स्थानकालगत आढळला मृतदेह

बेलापूर स्थानकालगत आढळला मृतदेह

नवी मुंबई : बेलापूर रेल्वे स्थानकालगतच्या कचराकुंडीत मृतदेहाचे तुकडे आढळल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला. ४० ते ४५ वर्षांच्या व्यक्तीचा हा मृतदेह असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. हत्येनंतर तुकडे करून ते प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून टाकण्यात आले होते.
बेलापूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील कचराकुंडीच्या ठिकाणी हा मृतदेह टाकण्यात आला होता. मंगळवारी सकाळी १०च्या सुमारास महापालिकेची घंटागाडी त्या ठिकाणचा कचरा उचलण्यासाठी आली होती. या वेळी कामगारांना दुर्गंधीचा त्रास जाणवल्यामुळे त्यांनी रेल्वे स्थानकाचे असिस्टंट आॅफिसर श्याम चोपडे यांना कळवले. त्यानुसार चोपडे यांनी ही माहिती सीबीडी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता पिशवीमध्ये मृतदेहाचे तुकडे आढळले.
मयताचे डोके, हात-पाय, छातीचा काही भाग वेगवेगळे करून पिशवीत गुंडाळलेले होते. मात्र मृतदेहाचा एक हात व पोटाचा काही भाग त्यामध्ये नव्हता. शरीराच्या उर्वरित भागाचा शोध घेण्यासाठी पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे, शहाजी उमाप, साहाय्यक आयुक्त धनराज दायमा व अरुण वालतुरे व सीबीडी पोलिसांनी परिसर पिंजून काढला.
या वेळी कचराकुंडीपासून काही अंतरावर झाडीमध्ये मृतदेहाचा उर्वरित भागदेखील आढळला. पाऊलवाटेलगतच्या झाडीमधून दुर्गंधी येत असल्याने त्या ठिकाणी पाहिले असता ते सापडले. कचराकुंडीपासून कुत्र्यांनी ते तिथपर्यंत नेल्याची शक्यता आहे. मृतदेहासोबत केवळ शर्टच्या बाह्यांचा तुकडा मिळाला आहे. मृतदेहाचे तुकडे जाणीवपूर्वक दोन ठिकाणी टाकले असल्याचीदेखील शक्यता उपआयुक्त शहाजी उमाप यांनी व्यक्त केली
आहे.
मृताची ओळख पटेल असा कसलाही पुरावा पोलिसांना आढळलेला नाही. मयताची जीभ व डोळे बाहेर आलेले आहेत. यावरून त्याची गळा दाबून हत्या केल्यानंतर तुकडे करून टाकलेले असावेत, असेही उपाम यांनी सांगितले.
मृतदेह किमान दोन दिवसांपूर्वीचा असून रात्रीच्या काळोखात त्या ठिकाणी टाकण्यात आला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Dead found in Belapur station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.