दि.बा. पाटील आंतराष्ट्रीय विमानतळ केवळ बॅनरवरच, पंतप्रधानांकडून नामकरणाची घोषणा न झाल्याने प्रकल्पग्रस्त संतप्त
By वैभव गायकर | Updated: October 8, 2025 21:33 IST2025-10-08T21:24:02+5:302025-10-08T21:33:46+5:30
Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबतची घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करतील अशी धारणा प्रकल्पग्रस्तांची झाली होती.त्या स्वरूपाचे बॅनर देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमानतळ परिसरात लावले होते.

दि.बा. पाटील आंतराष्ट्रीय विमानतळ केवळ बॅनरवरच, पंतप्रधानांकडून नामकरणाची घोषणा न झाल्याने प्रकल्पग्रस्त संतप्त
- वैभव गायकर
पनवेल - नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबतची घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करतील अशी धारणा प्रकल्पग्रस्तांची झाली होती.त्या स्वरूपाचे बॅनर देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमानतळ परिसरात लावले होते. मात्र दिबांच्या कार्याची आठवण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यापलीकडे दिबांच्या नावाची घोषणाच झाली नसल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये मोठी नाराजी पसरली.
विशेष म्हणजे मोदींचे भाषण संपत असताना कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रकल्पग्रस्तांनी दिबांच्या नावाची घोषणाबाजी सुरु केली.राज्य शासनाने केलेला ठराव केंद्र देखील मान्य करील खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील याबाबत सकारात्मक असल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिबा पाटील आंतराष्ट्रीय विमानतळ नामकरण समितीला दि.3 रोजी दिले होते.दिबांचे नाव नक्की लागेल या आशेत संपूर्ण प्रकल्पग्रस्त असताना या उदघाट्नच्या कार्यक्रमात नामकरणाचा मुद्दा मागे पडला.
काही दिवसापासुन नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाचे भले मोठे होर्डिंग्स,गेट्स,बॅनर्स देखील प्रकल्पग्रस्तांमध्ये चर्चेचा विषय ठरत होते .दिबांच्या नावासाठी आजवर मानवी साखळी आंदोलन,चक्का जाम आंदोलन,उपोषणे,कार रॅली यांसारखे असंख्य आंदोलने झाली आहेत.महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा केलेला ठराव देखील त्यांना सरकार जाता जाता मागे घ्यावा लागला होता.हाच ठराव पुढे महायुती सरकार मध्ये आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आणि केंद्राकडे पाठवला.तब्बल तीन वर्ष होऊन देखील नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लागू शकले नाही.विमानतळाचे काम पूर्ण झाल्याशिवाय असे नामकरण करता येत नसल्याचे वारंवार नेते मंडळी सांगत असताना विमानतळाचे उदघाटन झाले.या उदघाटनाचा मोठा फौज फाटा आणि तयारी पाहता नामकरणासाठी पुन्हा नव्याने कार्यक्रम आयोजित केला जाईल याची शक्यता धूसर झाली आहे.
दिबांच्या सुपुत्राने अद्यापही अपेक्षा-
दिबांचे नाव विमानतळाला देण्याबाबत जनभावना आहे.आज आम्हाला आशा होती कि याबाबत काही घोषणा होईल.मात्र पंतप्रधानांच्या भाषणात तशी हिंट देखील मिळाली नाही.मला आशा आहे सरकार दिबांच्या नावाबाबत निश्चितच विचार करेल अशी आशा दिबांचे सुपुत्र अतुल पाटील यांनी व्यक्त केली.
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्याचे आश्वासन आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.मात्र आजच्या कार्यक्रमात त्याबाबत काहीच निर्णय झाला नाही.यामुळे मी व्यथित झालो आहे.पुढील काही दिवसात सर्वपक्षीय बैठक बोलावली जाईल.यापुढे आरपारची लढाई लढल्याशिवाय पर्याय नाही.
- दशरथ पाटील
(अध्यक्ष ,दिबा पाटील आंतराष्ट्रीय विमानतळ नामकरण समिती )