लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिका निवडणुकीदिवशी पनवेल तालुक्याचे तापमान ३८ अंशावर गेले. उकाडा असह्य झाल्याने दुपारी मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता. नागरिक मतदानाकडे पाठ फिरविण्याची भीती वाटू लागल्याने, सर्वपक्षीय उमेदवारांनी उन्हामध्येच घरोघरी जाऊन मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी धावपळ सुरू केली होती. मतदानासाठी सकाळी सर्वच केंद्रावर मतदारांनी प्रचंड गर्दी केली होती; परंतु दुपारी उकाडा प्रचंड वाढल्याने बहुतांश केंद्रांवर शुकशुकाट निर्माण झाला होता. महापालिका निवडणूक उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये असल्याने उमेदवारांसाठी डोकेदुखी बनली होती. अनेक उमेदवारांनी गावी गेलेल्या मतदारांना गाडी पाठवून मतदानासाठी बोलावले होते. प्रत्येक मताचे महत्त्व लक्षात आल्याने उमेदवारांनी निवडणूक जाहीर झाल्यापासून संपर्क वाढविला होता. मतदानादिवशी अचानक तापमानामध्ये प्रचंड वाढ झाल्याने केंद्रामध्ये शुकशुकाट निर्माण झाला. यामुळे सर्वच उमेदवारांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरून आवाहन करण्यास सुरुवात केली. फोन करून व घरोघरी जाऊन मतदारांना केंद्रावर घेऊन येण्याची स्पर्धा सुरू झाली होती. अनेक उमेदवारांनी मतदारांना केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी वाहनांचीही सोय केली होती. मतदारांना शीतपेय, ज्यूस देण्याची व्यवस्थाही केली होती. सायंकाळी उन्हाची काहिली थांबल्यानंतर मतदारांनी पुन्हा रांगा लावण्यास सुरुवात केली. मतदानाचा टक्का वाढू लागल्यानंतर अनेक उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. उन्हामुळे मतदारांसह शहरवासीही त्रस्त झाले होते. दुपारी सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट होता.
मतदानादिवशी पनवेलचे तापमान ३८ अंशावर
By admin | Updated: May 25, 2017 00:26 IST