विक्रीसाठी आणलेला ३.८५ लाखाचा गुटखा जप्त; रबाळे एमआयडीसीत सापळा रचून कारवाई
By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 3, 2023 18:37 IST2023-04-03T18:37:33+5:302023-04-03T18:37:59+5:30
गुन्हे शाखा पोलिसांनी रबाळे एमआयडीसी परिसरातून ३ लाख ८५ हजाराचा गुटखा जप्त केला आहे.

विक्रीसाठी आणलेला ३.८५ लाखाचा गुटखा जप्त; रबाळे एमआयडीसीत सापळा रचून कारवाई
नवी मुंबई : गुन्हे शाखा पोलिसांनी रबाळे एमआयडीसी परिसरातून ३ लाख ८५ हजाराचा गुटखा जप्त केला आहे. संशयित टेम्पोची झडती घेतला असता हा गुटखा हाती लागला आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली असून ते रबाळे एमआयडीसी परिसरात राहणारे आहेत.
रबाळे एमआयडीसी परिसरात टेम्पोतून गुटखा आणला जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून अमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी सकाळी भीमनगर परिसरात सापळा रचला होता. यावेळी एक संशयित टेम्पो नजरेस पडला असता तो थांबवून झडती घेण्यात आली. यामध्ये टेम्पोतील गोण्यांमध्ये ३ लाख ८५ हजार रुपये किमतीचा गुटखा हाती लागला. पोलिसांनी या गुटख्यासह टेम्पो जप्त केला असून याप्रकरणी दोघांवर रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शिवशंकर मधेशिया व सुजित मधेशिया अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ते भीमनगर परिसरात राहणारे असून टेम्पोतून गुटखा घेऊन जात असताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान हा गुटखा कोणी मागवला होता व कोणाला दिला जाणार होता याची अधिक चौकशी गुन्हे शाखा पोलिस करत आहेत.