खारघरमध्ये अवतरणार कॉर्पोरेट सिटी; थीम-बेस्ड आयकॉनिक सिटी धोरणांतर्गत पहिला प्रकल्प

By नारायण जाधव | Updated: March 4, 2026 06:21 IST2026-03-04T06:21:22+5:302026-03-04T06:21:44+5:30

-नारायण जाधव लाेकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : नवी मुंबईला स्वतंत्र आर्थिक ओळख देण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा मानला जाणारा ...

Corporate city to come up in Kharghar; first project under theme-based iconic city policy | खारघरमध्ये अवतरणार कॉर्पोरेट सिटी; थीम-बेस्ड आयकॉनिक सिटी धोरणांतर्गत पहिला प्रकल्प

खारघरमध्ये अवतरणार कॉर्पोरेट सिटी; थीम-बेस्ड आयकॉनिक सिटी धोरणांतर्गत पहिला प्रकल्प

-नारायण जाधव
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबईला स्वतंत्र आर्थिक ओळख देण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा मानला जाणारा खारघर येथील आयसीपी अर्थात ‘इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क’ प्रकल्प आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या मार्गावर आहे. राज्य सरकारच्या ‘थीम-बेस्ड आयकॉनिक सिटी डेव्हलपमेंट’ धोरणांतर्गत सिडकोने हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे. यानुसार पुढच्या २० वर्षांत प्रकल्प टप्प्याटप्प्याने विकसित करण्यात येणार आहे.

सुरुवातीला तब्बल ३०० हेक्टरहून अधिक जागेवर प्रस्तावित असलेला हा प्रकल्प सुधारित आराखड्यानुसार आता १२० एकरांवर विकसित केला जाणार आहे. मात्र, आकार कमी झाला असला, तरी प्रकल्पाची व्यावसायिक क्षमता आणि धोरणात्मक महत्त्व अबाधित असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. यानुसार अधिकृतपणे निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

नवी मुंबईत नवीन ‘बीकेसी’ घडवण्याचे लक्ष्य
मुंबईतील बीकेसी अर्थात बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सप्रमाणेच नवी मुंबईत एक जागतिक दर्जाचे व्यावसायिक केंद्र उभारण्याचा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे.
आयटी-आयटीईएस, वित्तीय सेवा, बहुराष्ट्रीय कंपन्या, स्टार्टअप्स आणि कॉर्पोरेट मुख्यालयांसाठी एकात्मिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारे हे केंद्र ‘कॉर्पोरेट सिटी’ म्हणून विकसित होणार आहे. हा प्रकल्प खारघर शहरासह महामुंबईच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरेल. यामुळे रोजगार संधी वाढतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

कनेक्टिव्हिटी हे सर्वात मोठे बलस्थान
उपनगरीय लोकल व खारघर परिसराला आधीच नवी मुंबई मेट्रोची जोड मिळालेली आहे. याशिवाय आता नवी मुंबईतील तुर्भे ते खारघरला जोडणाऱ्या पारसिक डोंगराखालील बोगद्याच्या कामाने वेग पकडला आहे. शिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीएसारखे मोठे बंदर आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील टीटीसी वसाहतीतील आयटी पार्क, डेटा सेंटर्सचे जाळे जवळ असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील कॉर्पोरेट्ससाठी हा परिसर अत्यंत आकर्षक ठरणार आहे. शिवाय कर्नाळा-तळोजा लिंक रोडमुळे मुंबई-पुणे महामार्ग आणि जेएनपीटीशी जलद संपर्क उपलब्ध होणार आहे.  

२० वर्षांचा विकास आराखडा
सिडकोने हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने २० वर्षांच्या कालावधीत विकसित करण्याचे नियोजन केले आहे. 
या प्रकल्पाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘नो कमेंट’, असे सांगून 
अधिक बोलण्यास नकार दिला.

Web Title : खारघर में कॉर्पोरेट सिटी का उदय; प्रतिष्ठित शहर परियोजना शुरू।

Web Summary : खारघर का अंतर्राष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क, एक थीम-आधारित प्रतिष्ठित शहर परियोजना, विकास के लिए तैयार है। सिडको की 120 एकड़ की परियोजना का लक्ष्य मुंबई के बीकेसी की तरह एक विश्व स्तरीय व्यापार केंद्र बनाना है, जो अगले 20 वर्षों में नौकरियों और आर्थिक विकास को बढ़ावा देगा।

Web Title : Corporate City to emerge in Kharghar; Iconic city project begins.

Web Summary : Kharghar's International Corporate Park, a theme-based iconic city project, is set for development. CIDCO's 120-acre project aims to create a world-class business hub like Mumbai's BKC with enhanced connectivity, boosting jobs and economic growth over the next 20 years.