CoronaVirus News: दहा ठिकाणी सात दिवसांचा लॉकडाऊन, २९ जून ते ५ जुलैदरम्यान विशेष मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 00:01 IST2020-06-27T00:00:55+5:302020-06-27T00:01:16+5:30
या परिसरातील ७०,७१२ घरांमध्ये विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. येथे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानेही बंद ठेवण्यात येणार आहेत.

CoronaVirus News: दहा ठिकाणी सात दिवसांचा लॉकडाऊन, २९ जून ते ५ जुलैदरम्यान विशेष मोहीम
नवी मुंबई : कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असणाऱ्या दहा ठिकाणी लॉकडाऊन करण्याचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. या परिसरातील ७०,७१२ घरांमध्ये विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. येथे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानेही बंद ठेवण्यात येणार आहेत.
मनपा क्षेत्रातील परिस्थितीचा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. या बैठकीला खासदार राजन विचारे, पोलीस आयुक्त संजय कुमार, महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ उपस्थित होते.
सद्यस्थितीत शहरात ३४ कंटेन्मेंट झोन आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी दहा विशेष कंटेन्मेंट झोन जाहीर करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये दिवाळे गाव, करावे गाव, तुर्भे स्टोअर, तुर्भे सेक्टर २१, २२, जुहूगाव सेक्टर ११, बोनकोडे गाव, कोपरखैरणे गाव सेक्टर १९, रबाळे गाव व चिंचपाडा परिसराचा समावेश आहे.
२९ जून ते ५ जुलैदरम्यान या परिसरात विशेष लॉकडाऊन राहणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत. पालिका या दहा ठिकाणच्या घरांमध्ये जाऊन सर्वेक्षण करणार आहे. कोणीही संशयित रुग्ण सापडल्यास त्याची स्वॅब टेस्ट केली जाणार आहे.
>विभाग घरांची संख्या
दिवाळे गाव ३,७००
करावे गाव ९,४००
तुर्भे स्टोअर ११,२२०
सेक्टर २१ तुर्भे ६,०००
सेक्टर २२ तुर्भे ८,९५०
सेक्टर ११ जुहुगाव ९,०००
बोनकोडे गाव, सेक्टर १२ खैरणे ५,०१५
सेक्टर १९ कोपरखैरणे गाव ९,६००
रबाळे गाव २,९१८
चिंचपाडा ४,९००
एकूण ७०,७१२