coronavirus: नवी मुंबईत मॉल्ससह हॉटेल पुन्हा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 12:43 AM2020-09-03T00:43:51+5:302020-09-03T00:45:06+5:30

नवी मुंबईमधील जनजीवन सुरळीत होऊ लागले आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले असून, मृत्युदरही काही प्रमाणात नियंत्रणात येऊ लागला आहे.

coronavirus: Hotel,malls reopens in Navi Mumbai | coronavirus: नवी मुंबईत मॉल्ससह हॉटेल पुन्हा सुरू

coronavirus: नवी मुंबईत मॉल्ससह हॉटेल पुन्हा सुरू

Next

नवी मुंबई - शासनाच्या सूचनेनंतर महानगरपालिकेनेही नवी मुंबईमधील मॉल्स व हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सिनेमागृह, तरण तलाव, बार, आॅडिटोरिअम बंद ठेवले जाणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी नागरिकांनी मॉल्स व दुकानांसमोरही गर्दी करू नये, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
नवी मुंबईमधील जनजीवन सुरळीत होऊ लागले आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले असून, मृत्युदरही काही प्रमाणात नियंत्रणात येऊ लागला आहे. महानगरपालिकेने यापूर्वी मॉल्स व हॉटेल वगळता इतर सर्व व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली होती. बुधवारपासून मॉल्सही सुरू केले आहेत. वाशी, सीवूडसह शहरातील बहुतांश मॉल्स पुन्हा सुरू झाले आहेत, परंतु पहिल्याच दिवशी नागरिकांची तुरळक उपस्थिती होती. मोबाइलमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप असणाऱ्यांनाच आतमध्ये सोडले जात होते. सर्वांचे तापमानही तपासले जात होते. मॉल्स सुरू झाल्यामुळे तेथील कामगार व दुकान चालकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
शहरातील हॉटेल्सही सुरू करण्यात आली आहेत. यापूर्वी फक्त पार्सल घेऊन जाण्यास परवानगी दिली होती. आता हॉटेलमध्ये बसण्यासही परवानगी देण्यात आली आहे. जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले असले, तरी कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. प्रति दिन ३०० ते ४०० नवीन रुग्ण वाढत आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळावे. मॉल्स व दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी करू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

महानगरपालिकेने नागरिकांसाठी केलेल्या सूचना

सार्वजनिक, कामाच्या ठिकाणी व प्रवास करताना मास्क वापरणे बंधनकारक राहील.
सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फुटांचे अंतर असणे आवश्यक आहे.
लग्नकार्यासाठी ५० पेक्षा जास्त व अंत्यविधीसाठी २०पेक्षा जास्त नागरिकांनी उपस्थित राहू नये.
सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा, तंबाखूचे सेवन करण्यास मनाई.
जास्तीतजास्त अस्थापनांनी वर्क फ्रॉम होमला पसंती द्यावी.
कामाच्या ठिकाणी थर्मल स्क्रीनिंग, हात धुण्याची व्यवस्था, सॅनेटायजरची व्यवस्था करणे बंधनकारक असेल.

ज्येष्ठ नागरिकांना आवाहन
ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व गरोदर महिलांनाही कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होत आहे. यामुळे या सर्वांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.

वाहतुकीसाठी नियम पुढीलप्रमाणे
मनपा क्षेत्रात टॅक्सीमधून चालकासह एकूण चार प्रवासी, रिक्षामध्ये दोन प्रवासी, चारचाकी वाहनांमध्ये चार व दुचाकीवरून दोन प्रवाशांनीच प्रवास करणे बंधनकारक आहे. वाहतुकीसाठीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: coronavirus: Hotel,malls reopens in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.