पहिल्या टप्प्यात 17 हजार योद्ध्यांना लस; वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 01:09 IST2020-12-20T01:09:14+5:302020-12-20T01:09:39+5:30
corona virus : कोविड लसीकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पालिका मुख्यालयातील विशेष समिती सभागृहात टास्क फोर्स सभेचे आयोजन करण्यात आले होते.

पहिल्या टप्प्यात 17 हजार योद्ध्यांना लस; वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा समावेश
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोविड लसीकरणाचा पहिला टप्पा राबविण्याच्या दृष्टीने महापालिकेने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सुमारे १७ हजार कोविड योद्ध्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. यात आरोग्य सेवेशी निगडित नवी मुंबई पालिका तसेच खाजगी रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर, नर्सेस, फार्मासिस्ट, कर्मचारी, आशा, अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस तसेच वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी आदींचा समावेश करण्यात आला आहे.
कोविड लसीकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पालिका मुख्यालयातील विशेष समिती सभागृहात टास्क फोर्स सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी लसीकरणाची सुयोग्य कार्यवाही पार पाडण्यासाठी सर्वांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले. या बैठकीस वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके, उपआयुक्त क्रांती पाटील, सहा. आयुक्त संध्या अंबादे, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. अरुण काटकर, यूएनडीपीचे प्रतिनिधी गौतम कांबळे यांच्यासह जिल्हा लसीकरण अधिकारी उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी सादरीकरणाद्वारे लसीकरण मोहीम राबविण्यासाठी आवश्यक बाबींची तसेच महापालिकेच्या वतीने केलेल्या तयारीची माहिती दिली. पहिल्या टप्प्यात नवी मुंबई महापालिकेच्या ४२ केंद्रांमधील ४,४९० कर्मचारी तसेच खाजगी वैद्यकीय क्षेत्राशी निगडित ९०४ संस्थांतील १२,४३१ कर्मचाऱ्यांची महापालिकेकडे संगणकीकृत नोंद करण्यात आली आहे. लसीकरण सुरू झाल्यानंतर नोंदणी झालेल्या व्यक्तीस लसीकरणाचा दिवस व स्थळाबाबत त्याने नोंदणी केलेल्या मोबाइलवर मेजेस येणार आहे. लसीकरण झाल्यानंतर प्रमाणपत्र मोबाइलवर प्राप्त होणार आहे. लसीकरण स्थळाच्या रचनेमध्ये प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्ष स्वतंत्र असणार असून, प्रत्येक पथकामध्ये ४ व्हॅक्सीनेशन ऑफिसर व १ व्हॅक्सीनेटर ऑफिसर यांचा समावेश आहे. एका केंद्रावर दररोज १०० व्यक्तींना लस देणार आहे.
अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण
या लसीकरण मोहिमेसाठी राज्य तसेच जिल्हा स्तरावर प्रशिक्षण घेण्यात आले असून नवी मुंबई रपालिका स्तरावरही १७ डिसेंबर रोजी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडले आहे. २२ डिसेंबर रोजी कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे. लसीकरण झाल्यानंतरही वारंवार हात धुणे अथवा सॅनिटायझरचा वापर करणे तसेच मास्क घालणे व सामाजिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचे पालन बंधनकारक आहे. सर्व संबंधित संस्थांनी आवश्यकतेनुसार अपेक्षित मनुष्यबळ तसेच लसीकरणासाठी जागा अशा पूरक बाबी उपलब्ध करून द्याव्यात, असे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सूचित केले आहे.