पनवेल तालुक्यातील तळोजा गाव कोरोनामुक्त;फिव्हर क्लिनिकमुळे इतर आजारांवर सहज उपचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 23:57 IST2020-07-20T23:57:33+5:302020-07-20T23:57:56+5:30
तळोजा परिसरात सर्वात पहिला कोविड रुग्ण तळोजा गावात आढळला होता.

पनवेल तालुक्यातील तळोजा गाव कोरोनामुक्त;फिव्हर क्लिनिकमुळे इतर आजारांवर सहज उपचार
पनवेल : कोविडची साथ सर्वत्र फैलावत असताना बहुतांशी खासगी दवाखाने बंद आहेत. अशा परिस्थितीत तळोजा गावात ग्रामस्थांच्या पुढाकाराने फिव्हर क्लिनिक स्थापन करण्यात आले होते. या क्लिनिकमुळे ग्रामस्थांना इतर आजारांवर सहजरीत्या उपचार मिळत आहे. तळोजा गाव सध्याच्या घडीला कोविडमुक्त झाल्याने एक वेगळा आदर्श तळोजा ग्रामस्थांनी निर्माण केला आहे.
तळोजा परिसरात सर्वात पहिला कोविड रुग्ण तळोजा गावात आढळला होता. अशा परिस्थितीत गावात भीतीचे वातावरण पसरले होते. विशेष म्हणणे, साधारण सर्दी, खोकला झाला, तरीही ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत तळोजा ग्रामस्थांनी चार लाख रुपये खर्चून नगरसेवक अजीज पटेल यांच्या प्रयत्नाने पनवेल महापालिकेचे परवानगी घेऊन, गावातील पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या नॅशनल उर्दू शाळेत हे क्लिनिक सुरू केले. महिनाभरापूर्वी सुरू केलेल्या क्लिनिकमध्ये सुमारे १,४०० हून अधिक रुग्णांनी उपचार घेतले. जवळजवळ २० रुग्णांना कोरोनाची तीव्र लक्षणे असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी पुढे पाठविण्यात रुग्णालय यशस्वी ठरले.
शहरी भागातील डॉक्टर कोरोनाच्या भीतीने रुग्णांना तपासत नसताना, गावकीच्या आग्रहाखातर फोर्टीस रुग्णालयात काम करणारे डॉ.असिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली रुग्ण तपासणी करण्यात आली. डॉ.सामिया शेख, डॉ.भुसरा आणि पाच नर्सेस, दोन वॉर्डबॉय यांच्या साहाय्याने शाळेत सुरू केलेले क्लिनिक आजही सुरू आहे. १५ बेडची सुविधा असून, अत्यंत अत्यल्प दरात येथे रुग्णांना उपचार दिले जातात.
१५ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या
च्प्राथमिक स्वरूपात काही ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारचा किरकोळ त्रास जाणवताच, तत्काळ या ठिकाणी उपचार मिळत असल्याने, आमचे गाव कोविडमुक्त झाल्याचे नगरसेवक अजीज पटेल यांनी सांगितले. च्विशेष म्हणजे, १५ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले तळोजा हे गाव तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे.