पावसामुळे भाजीपाला, फळांकडे ग्राहकांनी फिरविली पाठ; APMC बाजारात बराच भाजीपाला सडला...
By नामदेव मोरे | Updated: August 20, 2025 12:25 IST2025-08-20T12:24:17+5:302025-08-20T12:25:13+5:30
भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्याची ओढवली नामुष्की

पावसामुळे भाजीपाला, फळांकडे ग्राहकांनी फिरविली पाठ; APMC बाजारात बराच भाजीपाला सडला...
नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मुसळधार पावसाचा फटका कृषी व्यापारासही बसला आहे. मंगळवारी भाजीपाला, फळ मार्केटकडे ग्राहकांनी पाठ फिरविली. यामुळे जवळपास २५ टक्के भाजीपाल्याची विक्रीच झाली नाही. भिजल्यामुळे ५० टनपेक्षा जास्त मालाचे नुकसान झाले आहे. ग्राहक नसल्यामुळे बाजारभावही घसरले असून, किरकोळ मार्केटमध्येही दर नियंत्रणात आले आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये मंगळवारी ४९० ट्रक टेम्पोमधून १७९२ टन भाजीपाला विक्रीसाठी आला होता. तीन दिवसांपासून मंदी असल्यामुळे आवकही कमी झाली. गरजेपेक्षा कमी आवक होऊनही जवळपास ४५० ते ५०० टन भाजीपाल्याची विक्री झाली नाही. भिजल्यामुळे कोथिंबीर, टोमॅटोसह इतर पालेभाज्या सडण्याचे प्रमाण वाढले आहे.
धान्य मार्केटवरही परिणाम
फळमार्केटमध्येही ग्राहकांनी पाठ फिरविली होती; परंतु या ठिकाणी भाजीपाल्याच्या तुलनेमध्ये माल जास्त खराब झाला नाही. कांदा, बटाटा, धान्य व मसाला मार्केटमध्येही ग्राहकांचे प्रमाण कमी असल्याची माहिती
व्यापाऱ्यांनी दिली.
कांदा, बटाटा, लसूण मार्केटमध्ये ग्राहकांची संख्या कमी होती.
दिगंबर राऊत, कांदा व्यापारी
भाजीपाला मार्केटमध्ये आवक कमी झाली होती; परंतु ग्राहकच नसल्यामुळे माल शिल्लक राहिला आहे.
शंकर पिंगळे, संचालक, भाजीमार्केट
फळमार्केटमध्ये २५ टक्केही व्यापार झाला नाही. मुंबईतील पावसाचा परिणाम विक्रीवर झाला आहे.
संजय पानसरे, संचालक, फळमार्केट