सिडकोच्या घरांकडे पोलिसांची पाठ, मुदत वाढवूनही प्रतिसाद नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 00:23 IST2020-09-18T00:22:53+5:302020-09-18T00:23:17+5:30
‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वावर घरांची निर्मिती करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.

सिडकोच्या घरांकडे पोलिसांची पाठ, मुदत वाढवूनही प्रतिसाद नाही
नवी मुंबई : सिडकोने खास पोलिसांसाठी सुरू केलेल्या गृहयोजनेला सुरुवातीच्या काळात पोलिसांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु मागील १५ दिवसांत पोलिसांनी या घरांकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले आहे. कारण आतापर्यंत केवळ ३,९६२ अर्ज सिडकोला प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे अर्ज भरण्यासाठी मुदत एक महिन्याने वाढवूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले
आहे.
‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वावर घरांची निर्मिती करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार, २0१८ मध्ये सिडकोच्या माध्यमातून १५ हजार घरांची योजना जाहीर करण्यात आली होती. याच गृहप्रकल्पात ४,४६६ घरे खास पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. या घरांसाठी २८ जुलैपासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे. २९ आॅगस्ट ही अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. परंतु सिडकोने ही मुदत २९ सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे. असे असले तरी मागील १५ दिवसांत केवळ अडीचशे अर्ज सिडकोला प्राप्त झाले आहेत. मागील दीड महिन्यात ४,४६६ घरांसाठी केवळ ३,९६२ अर्ज सिडकोला प्राप्त झाले आहेत.
एकूणच सिडकोने खास पोलिसांसाठी गाजावाजा करीत जाहीर केलेल्या या घरांकडे पोलिसांनीच पाठ फिरविल्याने सिडकोसमोर पेच निर्माण झाला आहे. अर्ज भरण्याची मुदत वाढविल्याने १५ सप्टेंबर रोजी नियोेजित केलेली संगणकीय सोडत पुढे ढकलण्यात आली आहे. तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच नोडमध्ये सध्या सिडकोच्या महागृहप्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे.
खास पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या ४,४६६ घरांपैकी १,0५७ सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तर उर्वरित ३,४0९ सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी असणार आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात सेवा बजावणाºया पोलीस कर्मचाऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.