नवी मुंबईत सिडकाे उभारणार ‘पंतप्रधान एकता मॉल’; राज्य सरकारकडून समितीची स्थापना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 14:18 IST2025-08-19T14:17:37+5:302025-08-19T14:18:05+5:30
तीन महिन्यांत देणार अहवाल

नवी मुंबईत सिडकाे उभारणार ‘पंतप्रधान एकता मॉल’; राज्य सरकारकडून समितीची स्थापना
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विविध राज्यांमधील आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने एकाच छताखाली विकली जावीत, यासाठी ‘पंतप्रधान एकता मॉल’ची उभारणी केली जाणार आहे. या मॉलची उभारणी नवी मुंबईच्या उलवेमध्ये सिडकोमार्फत केली जाईल.
‘अनेकतेत एकता’ हा विचार समोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक राज्यात असा एक माॅल उभारला जावा, असे निर्देश दिले होते. देशी उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावी. त्यातून राष्ट्रीय एकात्मता साधली जाईल आणि आर्थिक विकासही साध्य होईल. स्थानिक कारागीर, व्यावसायिक आणि उद्योजक यांना हक्काचे व्यासपीठ मिळेल. हा पुढाकार ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांचा एक भाग आहे.
मॉलमध्ये देशाच्या राज्यांमधील उत्पादनांचा एक तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांतील उत्पादनांचा प्रत्येकी एक स्टॉल असेल. याच्या देखभालीसाठीचे धोरण राज्य सरकारची समिती तयार करेल. नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव हे समितीचे अध्यक्ष आहेत. सदस्यांमध्ये वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव, महिला व बालकल्याण विभागाचे प्रधान सचिव आणि सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हे सदस्य आहेत. उलवेमधील मॉलसाठी सिडकोने ५२०० चौरस फूट जागाही निश्चित केली आहे.
देशभरातील कलावंत सादर करणार आपली कला
पंतप्रधान एकता मॉलच्या माध्यमातून पर्यटनालाही चालना मिळेल. मॉलच्या परिसरात सांस्कृतिक सभागृहांची उभारणी केली जाईल. देशभरातील कलावंत तेथे आपल्या कलांचे सादरीकरण करतील. मॉलमध्ये फूड कोर्टही असतील. मॉलच्या उभारणीसाठी केंद्र सरकार अर्थसहाय्य करणार आहे.