विकासकामे पूर्ण करण्याचे आव्हान; पावसाळ्यापूर्वी अंतिम मुदतीसाठी ठेकेदारांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:58 AM2020-05-27T00:58:08+5:302020-05-27T06:43:49+5:30

अनेक कामे अपूर्ण

The challenge of completing development work; Contractors rush for deadlines before the rains | विकासकामे पूर्ण करण्याचे आव्हान; पावसाळ्यापूर्वी अंतिम मुदतीसाठी ठेकेदारांची धावपळ

विकासकामे पूर्ण करण्याचे आव्हान; पावसाळ्यापूर्वी अंतिम मुदतीसाठी ठेकेदारांची धावपळ

Next

नवी मुंबई : शहरातील सुरू असलेली विकासकामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. परंतु अद्याप अनेक कामे अपूर्ण असल्याने ती पूर्णत्वास नेण्यास ठेकेदारांची धावपळ सुरू आहे.

शहरात रस्ते, गटर, पदपथ दुरुस्तीसह अनेक विकास कामे सुरू आहेत. ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून रस्त्यावर पडलेला बांधकामाचा कचरा हटविण्यात यावा, खोदलेले रस्ते तत्काळ दुरुस्त करावेत, पावसाचे पाणी जाण्यात अडथळे निर्माण होऊ नयेत, याची काळजी घ्यावी अशा सूचना आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिल्या आहेत. गटार, रस्ते, पदपथ खोदून ठेवले आहेत. ही कामे लवकर पूर्ण झाली नाहीत तर पावसाळ्यात फटका बसण्याची शक्यता आहे.

काम सुरू असलेल्या ठिकाणी मनपाचे अधिकारी दिसत नाहीत. यामुळे कामाचा दर्जा खालावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँक्रिटीकरणासाठी रस्त्याचे खोदकाम : पनवेल : पावसाळ्याच्या तोंडावर काँक्रिटीकरणासाठी शहरातील वर्दळीचा रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून काँक्रिटीकरणाचे काम रखडले आहे. केवळ खोदकाम झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पनवेल शहरात प्रवेश करण्यासाठी सुरूची हॉटेल परिसरातील मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

सध्याच्या घडीला लॉकडाउनच्या काळात वाहनांची वर्दळ काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र नियमित या मार्गाचा वापर करणाऱ्यांची खोदकामामुळे गैरसोय होत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. मात्र अद्याप काम सुरू झालेले नाही. पावसाळा तोंडावर असताना कामही पूर्ण नाही आणि खोदलेला रस्ताही पूर्ववत करण्यात न आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. हे काम नेमक कसे आणि कधी पूर्ण होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Web Title: The challenge of completing development work; Contractors rush for deadlines before the rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.