डीआयजी निशिकांत मोरे यांच्याविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 21:40 IST2019-12-26T21:23:47+5:302019-12-26T21:40:30+5:30
अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन

डीआयजी निशिकांत मोरे यांच्याविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
पनवेल :खारघर मध्ये वास्तव्यास असलेले आणि पुणे येथे एम टी विभागात डीआयजी पदावर असलेले निशिकांत मोरे यांच्यावर गुरुवारी पोस्को अंतर्गत तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन केल्यासंदर्भात पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी मोरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
सदर व्यक्तीच्या विरोधात तक्रार करण्यासाठी तळोजा आणि खारघर पोलीस ठाण्यात गेल्यानंतरही तक्रार दाखल करून घेत जात नसल्याने पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी खारघर मध्ये पत्रकार परिषद घेतली होती. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून निवेदन देणार असल्याचे मुलीच्या वडिलांनी परिषदेत सांगितले होते.
तळोजा वसाहतीत वास्तव्यास असलेले विकसक पीडित मुलीचे वडील आणि डीआयजी निशिकांत मोरे यांची आठ वर्षांपूर्वी खारघर मध्ये ओळख झाली. त्यामुळे एकमेकांच्या घरी ये जा करीत असे,मोरे यांनी त्यांच्याकडून दुकान गाळे विकत घेतले. काही पैसे रोख देवून दुकान गाळ्याचा ताबा घेवून उर्वरित पैसे देवू असे सांगितले. दुकान गाळ्याचे पैसे देत नसल्याने विकासकांनी आगष्ट महिन्यात नवी मुंबई पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली.
दरम्यान, जून महिन्यात सतरा वर्षाच्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी निमंत्रण नसतांनाही मोरे घरी आले आणि केप कापून मुलीच्या गालावर आणि शरीरावर केक लावून अश्लील वर्तन केल्याचे निदर्शनास आले. मोरे यांच्या विरोधात तळोजा आणि खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता तक्रार दाखल करून घेतले नसल्याचा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केला होता.अखेर याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस अधिक तपास करीत आहेत.