पोलिसाला मारहाण करणाऱ्या तिघांवर गुन्हा; दुचाकीस्वाराला देत होते समज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 09:55 IST2024-12-22T09:55:21+5:302024-12-22T09:55:34+5:30
मुलुंड-ऐरोली मार्गावरील घटना

पोलिसाला मारहाण करणाऱ्या तिघांवर गुन्हा; दुचाकीस्वाराला देत होते समज
नवी मुंबई : वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच ट्रकसमोर आलेल्या दुचाकीस्वाराला समज दिली असता त्याने व त्याच्या कुटुंबीयांनी वाहतूक पोलिस अधिकाऱ्याला मारहाण केली. मुलुंड-ऐरोली मार्गावर शुक्रवारी ही घटना घडली. या प्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आला असून आदर्श तिवारी (२२), आदित्य तिवारी (२०) व अनिता तिवारी (४०) अशी तिघांची नावे आहेत.
रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न
रात्री मोठ्या प्रमाणात अवजड वाहने या मागनि धावत असताना वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे चौकातला सिग्नल बंद करून वाहतूक पोलिस स्वतः तिथली वाहतूक नियंत्रित करत होते.
त्यावेळी मुलुंडकडून ऐरोलीकडे येणारी लेन खुली केल्याने अवजड वाहने धावत होती. त्याचवेळी विरुद्ध दिशेच्या मार्गावरून एक दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला.
त्यात थोडक्यात अपघात टळल्याने बंदोबस्तावरील सहायक पोलिस निरीक्षक तुषार गुरव यांनी दुचाकीस्वाराला थांबवून समज देत होते.
बंदोबस्तातील वाहतूक पोलिसांसोबत वाद
याचा राग आल्याने आदर्श तिवारी (२२) याने बंदोबस्तावरील वाहतूक पोलिसांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली.
घरी फोन करून आई व भावाला त्या ठिकाणी बोलवून घेतले असता त्यांनी गुरवना धक्काबुकी केली.
रबाळे पोलिसांना घटनास्थळी बोलवले असता त्यांनी आदर्श तिवारी, आदित्य तिवारी, व अनिता तिवारी यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.