बिद्रे प्रकरणाचा खटला दुसऱ्या न्यायालयात द्यावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 04:44 AM2020-01-11T04:44:58+5:302020-01-11T04:45:04+5:30

अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजेश अस्मर यांच्या न्यायालयात सुरू आहे.

The case of Bidre should be referred to another court | बिद्रे प्रकरणाचा खटला दुसऱ्या न्यायालयात द्यावा

बिद्रे प्रकरणाचा खटला दुसऱ्या न्यायालयात द्यावा

Next

पनवेल : अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजेश अस्मर यांच्या न्यायालयात सुरू आहे. हा खटला त्यांच्याकडून दुसºया न्यायालयाकडे देण्याची मागणी अश्विनी बिद्रे यांचे पती राजीव गोरे यांनी सरन्यायाधीशांना १ जानेवारी रोजी लिहिलेल्या पत्रात केली आहे.
या खटल्यातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर यांचे वकील विशाल भानुशाली व या खटल्याचे न्यायाधीश राजेश अस्मर यांची ज्युनिअरशिप एकाच ठिकाणी झाल्याने त्याचा फायदा आरोपींना वाचविण्यासाठी होऊ शकतो, असा दावा गोरे यांनी या पत्रात केला आहे. त्यामुळे अश्विनी बिद्रे प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे.
अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला सुरुवातीला अलिबाग सत्र न्यायालयात सुरू होता. पनवेलमध्ये नव्याने सत्र न्यायालय सुरू झाल्याने हा खटला पनवेल सत्र न्यायालयात न्यायाधीश राजेश अस्मर यांच्या कोर्टासमोर सुरू झाला. जेव्हापासून हा खटला न्यायमूर्ती अस्मर यांच्यासमोर आला आहे, तेव्हापासून अभय कुरुंदकरच्या नातेवाइकांची दादागिरी वाढली आहे. न्यायाधीश अस्मर व आरोपीचे वकील विशाल भानुशाली यांनी ठाणे येथील वकील गजानन चव्हाण यांच्याकडे ज्युनिअरशिप केल्याने या प्रकरणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता गोरे यांनी वर्तविली आहे. आरोपीचे वकीलपत्र घेताना भानुशाली यांनी ही माहिती उघड करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी ही माहिती लपविल्याचे गोरे यांनी सांगितले. या प्रकरणातील न्यायाधीश राजेश अस्मर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. कोल्हापूर येथील इचलकरंजी न्यायालयात न्यायाधीश असताना २०१६ ते २०१८ दरम्यान त्यांच्याविरोधात लेखी तक्रारी उच्च न्यायालयात दाखल झालेल्या असल्याने त्यांना या खटल्यापासून दूर ठेवण्याची विनंती भारताच्या सरन्यायाधीशांकडे करण्यात आली आहे.
सरकारी वकील वकीलपत्र सोडण्याच्या तयारीत
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयीन कामकाजासाठी प्रत्येक दिवसाची फी ३० हजार देण्याची मागणी शासनाकडे केली होती. मात्र, त्यांना केवळ १५ हजार रुपये फी गृहमंत्रालयाकडून दिले जात असल्याने घरत हा खटला सोडण्याच्या तयारीत आहेत. तशा आशयाचे पत्र त्यांनी नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला लिहिले आहे.
>आनंद बिद्रे यांची उलटतपासणी पूर्ण
अश्विनी बिद्रे यांचे भाऊ आनंद बिद्रे यांची उलटतपासणी पाच महिन्यांपेक्षा जास्त काळापासून सुरू होती. ती शुक्रवारी पूर्ण झाली. या वेळी बिद्रे यांना या खटल्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या रीट याचिका, तसेच दाखल तक्रारीबाबत विचारणा करण्यात आली. सुमारे तीन तास ही उलटतपासणी सुरू होती. या खटल्याची पुढील सुनावणी २२ जानेवारीला होणार आहे.

Web Title: The case of Bidre should be referred to another court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.