Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 08:50 IST2025-07-26T08:50:07+5:302025-07-26T08:50:35+5:30
जेट्टीला सुरक्षा कठडा नसल्याने कार त्याठिकाणी न अडता थेट खाडीत पडली. हा प्रकार जवळच असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांच्या निदर्शनात आला.

Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
नवी मुंबई : गुगल मॅपच्या आधारे उलवेला जाणारी भरधाव कार थेट खाडीत कोसळल्याची घटना मध्यरात्री बेलापूरमध्ये घडली. घटनेवेळी तिथे उपस्थित असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांनी वेळीच महिलेचे प्राण वाचवले. शिवाय क्रेनच्या साहाय्याने खाडीत पडलेली कार देखील बाहेर काढण्यात आली.
गुगल मॅप लावून धावणाऱ्या वाहनांचे अपघात घडत असल्याचे प्रकार देशभरात घडत आहेत. अशीच घटना नवी मुंबईत देखील गुरुवारी मध्यरात्री (शुक्रवारी पहाटे १ वाजता) घडली आहे. एक महिला त्यांच्या कारने उलवेच्या दिशेने चालली होती. मात्र बेलापूर येथील खाडीपुलावर जाण्याच्या ऐवजी त्यांनी पुलाखालील मार्ग निवडला. यामुळे गुगल मॅपवर दिसत असल्याप्रमाणे तिथे सरळ रस्ता असल्याचे त्यांना वाटले. यामुळे त्यांची कार थेट ध्रुवतारा जेट्टीवर जाऊन खाडीत कोसळली. जेट्टीला सुरक्षा कठडा नसल्याने कार त्याठिकाणी न अडता थेट खाडीत पडली.
नवी मुंबईच्या बेलापूर येथे कार खाडीत कोसळली, पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला महिलेचा जीव #NaviMumbaipic.twitter.com/un5vYdIKFy
— Lokmat (@lokmat) July 26, 2025
हा प्रकार जवळच असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांच्या निदर्शनात आला. यामुळे सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, कारमधील महिला वाहत जात असल्याचे दिसून आले. त्यांना गस्ती व रेस्क्यू बोटीच्या साहाय्याने बाहेर काढून प्राण वाचवण्यात आले. तर खाडीत पडलेली कार क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली. गुगल मॅपवर रस्ता पाहत जात असताना रस्ता संपून पुढे जेट्टी असल्याचे न कळल्याने हा अपघात घडल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. दरम्यान सागरी सुरक्षा पोलिस चौकीच्या समोरच हि दुर्घटना घडल्याने वेळीच महिलेला मदत मिळून त्यांचे प्राण वाचले.